www.24taas.com, नवी दिल्ली
१९९३ मधल्या दिल्ली स्फोटातला दोषी देविंदर पाल सिंगची फाशी माफ करण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी पंतप्रधानांची भेट घेतलीय. देविंदर पाल सिंग भुल्लर यानं केलेला द्या अर्ज फेटाळून लावत सुप्रीम कोर्टानं त्याची फाशी कायम ठेवलीय.
‘सध्या आमच्या राज्याला शांततेची सगळ्यात जास्त गरज आहे. मुळातच पंजाबमधल्या लोकांसाठी हा भावनेचा मुद्दा आहे. भुल्लरच्या मुद्द्यावरुन शांतता धोक्यात येऊ शकते, असा इशारा आम्ही केंद्र सरकारला दिलाय. त्याचबरोबर भुल्लरची प्रकृतीही बिघडलीय. अशा परिस्थितीत त्याला फाशी देऊन काय मिळवणार?’ असं प्रकाशसिंग बादल यांनी केंद्र सरकारला विचारलंय.
फाशीची शिक्षा रद्द करावी यासाठी भुल्लरनं दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी फेटाळली होती. काँग्रेसनं खलिस्तान्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईनंतर काँग्रेसचा बदला घेण्यासाठी भुल्लरनं १९९३ मध्ये दिल्लीत बॉम्बस्फोट घडवले होते. त्यात नऊ जणांचा बळी गेला होता. या प्रकरणात १९९५ मध्ये भुल्लरला जर्मनीतून अटक करण्यात आली होती.
आजारपणामुळे फाशी टळणार?
सर्वोच्च न्यायालयाच्या शिक्कामोर्तबानंतरही दहशतवादी देविंदरपालसिंग भुल्लारची फाशी आजारपणामुळे टूळ शकते. कारण, भुल्लर अडीच वर्षांपासून रुग्णालयात मानसिक आजारावर उपचार घेत आहे. रुग्णालयातून सुटी मिळाल्याशिवाय त्याच्या फाशीची तारीख ठरवली जाऊ शकत नाही.
आत्महत्येच्या प्रवृत्तीमुळे `इन्सिट्यूट ऑफ बिहेवियर अॅन्ड अलाइड सायन्सेस`मध्ये दाखल करण्यात आले होते. अर्थात, तुरुंगात त्याने कधी आत्महत्येचा प्रयत्न केला नव्हता. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा आहे, परंतू इच्छाशक्तीच उरलेली नाही. तो पूर्णपणे बरा होणे कठीण आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.