बनावट चकमक : पांडेचं न्यायालयासमोर आत्मसमर्पण

सुप्रीम कोर्टानं जामीनअर्ज फेटाळल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आयपीएस अधिकारी पी.पी. पांडे यांनी सीबीआय न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 13, 2013, 02:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
सुप्रीम कोर्टानं जामीनअर्ज फेटाळल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आयपीएस अधिकारी पी.पी. पांडे यांनी सीबीआय न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलंय. पांडे हे इशरत जहाँ हिच्या बनावट चकमक प्रकरणातल्या आरोपींपैकी एक आहेत.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं पांडे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला होता. ते १९८२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. फरार म्हणून घोषित केल्या गेलेल्या पांडे यांना अटकपूर्व जामीन देण्यास कोर्टानं नकार दिला होता. तसंच इशरत जहाँ हिच्या बनावट चकमकप्रकरणी त्यांच्यावर अजामीनपात्र वारंटही बजावण्यात आलं होतं. न्यायालयासमोर उपस्थित न राहिल्यानं विशेष सीबीआय न्यायालयानं पांडे यांना फरार घोषित केलं होतं.
१५ जून २००४ रोजी मुंबईच्या एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या इशरत, प्रणेश पिल्लई, अमजद अली राणा आणि जीशान जोहर यांना अहमदाबादजवळचं गुन्हे शाखा अधिकाऱ्यांनी ठार केलं होतं त्यावेळी पी. पी. पांडे अहमदाबादचे संयुक्त पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते.

याप्रकरणात पांडे यांच्यासहीत गुजरातच्या सात पोलीस अधिकाऱ्यांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आलंय. सीबीआयनं त्यांच्याविरुद्ध हत्या तसंच कट रचणं यांसारखे गंभीर आरोप दाखल केलेत. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.