www.24taas.com, चंदीगड
पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील एका २२ वर्षीय तरुणीला पोलिसांनी रस्त्यावरच सर्वांदेखत मारहाण केल्याची घटना घडलीय. एका व्हिडिओ क्लिपमुळे ही गोष्ट उघड झाल्यानंतर प्रशासनानं तात्काळ कारवाई करत चार पोलिसांना निलंबत केलंय.
रस्त्यावर काही लोकांनी दुर्व्यवहार आणि अश्लील कमेंटस् केल्यानंतर संबंधित हरबिन्दर कौर या मुलीनं तक्रार नोंदविण्यासाठी पोलिसांशी संपर्क केला होता. त्यानंतर या मुलीला मदत करण्याऐवजी पोलिसांनी मुलीला आणि तिच्या वडिलांनाच मारहाण केली.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित मुलीचा पिता नशेमध्ये होता. दारुच्या नशेत तो एका विवाहात जाऊनही गोंधळ घालत होता. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मुलीच्या वडील कश्मीर सिंह यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा संबंधित मुलगी मध्ये पडली आणि तिनं पोलिसांना विरोध केला. कश्मीर सिंहला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेत असताना पोलिसांना तिनं रोखून धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तिला मारहाण केली.
परंतू, मुलीच्या म्हणण्यानुसार, एका ट्रक ड्रायव्हरनं छेडछाड केल्यानंतर तिनं पोलिसांशी संपर्क साधला. परंतू, पोलिसांनी ड्रायव्हरकडून लाच घेऊन मुलीलाच मारहाण केली.
वरीष्ठ पोलीस अधिक्षक कंवलजीत सिंह ढिल्लो यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. ‘पोलिसांनी त्या मुलीला मारहाण करायला नको होती. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे’ असं सांगतानाच संबंधित चारही पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय.