बंगळूरु : परफ्युम स्पेशालिस्ट आणि फोटोग्राफर मोनिका घुर्डे हिच्या बलात्कार आणि खून प्रकरणाचं गूढ उकललंय. पैशासाठीच मोनिकाची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. या प्रकरणी एकाला गोवा पोलिसांनी बंगळुरुमधून अटक केलीय.
राजकुमार सिंग असं या पंजाबी व्यक्तीचं नाव असून तो भटिंडाचा आहे. मोनिकाची हत्या करुन त्याने तिचा मोबाईल आणि क्रेडिट कार्ड चोरलं होतं. त्यानंतर तिचे कार्ड वापरुन पैसेही काढले होते. यावरुन पोलिसांनी राजकुमार सिंगच्या मागावर राहून त्याच्या मुसक्या आवळल्यात. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला सोमवारी गोव्यात आण्यात येणार आहे.
परफ्युम स्पेशालिस्ट मोनिका मूळची मुंबईची होती. ती देशभरात परफ्यूम वापराची कार्यशाळा घ्यायची. गोव्यामधल्या सांगोल्डा इथे सपना राज संकुलातल्या जास्मीन इमारतीत पहिल्या मजल्यावर ती राहायची. तिच्या घरातच शुक्रवारी तिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता.