www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
देशाचे भावी पंतप्रधान म्हणून स्पर्धेत उतरणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांशी भेदभाव केल्याचं दिसून आलं. अहमदाबादच्या ‘शुमार द हिमालयन’ या भल्या मोठ्या मॉलमध्ये शुक्रवारी मुस्लिम बांधवांकडून २० रुपये एन्ट्री फी वसूल केली.
एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांचा उत्साह शिगेला असताना केवळ अल्पसंख्यांकांकडून या मॉलमध्ये एन्ट्री फी घेतली गेली. मॉलमधून काहीतरी खरेदी केल्यानंतर त्यांना हे पैसे परत केले गेले. परंतू ज्या लोकांनी या मॉलमधून काहीही खरेदी केली नाही त्यांना मात्र मॉलनं हे पैसे परत केले नाहीत.
‘इथल्या सुरक्षाव्यवस्थेनं काही ठराविक लोकांकडून ही फी वसूल केली. आम्ही अशा अनेक लोकांना पाहिलं ज्यांच्याकडून ही फी घेतली गेली नाही... यासंबंधी सुरक्षाव्यवस्थेला विचारलं तर त्यांनी आपल्याला तसा हुकूम मिळाल्याचं सांगितलं’ असं इथं आलेल्या सय्यद शेख यांनी सांगितलं.
शाहपूरच्या इलियास अन्सारी या नागरिकानं या भेदभावावरून खेद व्यक्त केला. ते म्हणतात, ‘आम्ही एन्ट्री फी देण्यास तयार आहोत... पण ती भेदभाव न करता सगळ्यांकडून वसूल केली गेली तरच... केवळ एका समुदायासोबत हा भेदभाव का?’
मॉलनं मात्र याला साफ नकार दिलाय. ऑपरेशन मॅनेजर दीपा भटनागर यांच्या म्हणण्यानुसार, ‘आम्ही असामाजिक तत्त्वांना दूर ठेवण्यासाठी असं केलं. दिवाळीसहीत आगामी सगळ्याच सणांमध्ये अशीच एन्ट्री फी वसूल करण्याच्या योजनेचाही आम्ही विचार करत आहोत. ग्राहकांनी खरेदी केली तर ते पैसे त्यांना परत दिले जातात. तसं पाहिलं तर एन्ट्री व्यावहारिक रुपात मोफतच होती’.
इथं आलेल्या मुस्लिम बांधवांना आलेल्या अनुभवावरून मोदींची सद्भावना रॅली यशस्वी होणार की नाही, हे येणारा काळच ठरवेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.