www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आगामी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीच्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजपला शह देण्यासाठी ११ पक्ष एकत्र आले आहेत. संसदेत एक वेगळा गट स्थापन करण्यात आला आहे. नव्या गटातील पक्ष धर्म निरपेक्ष, जनतेचं कल्याण, या मुद्यावर एकत्र आलेले आहेत.
संसदेच्या परिसरात या ११ पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेउन या नवीन गटाची घोषणा केली. या गटात चार डावे पक्ष, समाजावादी पक्ष, जदयू, अण्णाद्रमुक, आसम गण परिषद, झारखंड विकास मोर्चा, जनता दल सेक्युलर, बीजू जनता दल या पक्षांचा समावेश आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी आणि जदयू अध्यक्ष शरद यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत ह्या पक्षांची बैठक मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये घेण्यात आली होती. नवी आघाडी जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे, असं यावेळी सांगण्यात आलं.
भ्रष्टाचारविरोधी सहा विधेयकं सरकार पारित करणार आहे. याच विधेयकांचा वापर काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडी निवडणुकीच्या प्रचारासाठी करणार आहे. त्यामुळे या सर्व विधेयकांना नवी आघाडी विरोध करेल. विधेयकांचा वापर प्रचारासाठी योग्य नाही, असं मत यावेळी तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलयं.
या पक्षांचा एकमेकांना धोका देण्याचा इतिहास सर्वश्रृत आहे. याच प्रश्नावर एका पत्रकाराने छेडले असता, इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही, असं उत्तर भाकपचे गुरूदास दासगुप्ता यांनी दिले.
आम्ही भविष्याबद्दल आशावादी आहोत, कारण संपूर्ण जगच परस्पर विश्वासावर आधारलेलं आहे, असं मत सीताराम येचुरी यांनी व्यक्त केलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.