सेक्स स्कँडल : तेजपालला कोर्टाकडून दिलासा नाहीच

‘तहलका’ सेक्स स्कँडल प्रकरणात स्वत:ला शोधपत्रकार म्हणवून घेणाऱ्या तरुण तेजपाल याला हायकोर्टाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 27, 2013, 07:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘तहलका’ सेक्स स्कँडल प्रकरणात स्वत:ला शोधपत्रकार म्हणवून घेणाऱ्या तरुण तेजपाल याला हायकोर्टाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. २९ नोव्हेंबर रोजी तेजपालच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय देणार आहे. परंतु, या दरम्यान तेजपालला अटक करण्यापासून पोलिसांना मात्र कोर्टानं मनाई केलेली नाही. तेजपालची अटक थांबविण्यास दिल्ली हायकोर्टानं नकार दिलाय. दरम्यान, गोवा पोलिसांनी तरुण तेजपालला उद्या, गुरुवारी दुपारी तीन वाजल्याच्या अगोदर पोलिसांसमोर हजर राहण्यासंबंधी समन्स बजावले आहे.
महत्त्वाचं म्हणजे तरुण तेजपालनं या प्रकरणात दिल्ली हायकोर्टाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तरुण तेजपालला वाचविण्यासाठी तेजपालच्या कुटुंबीयांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेतल्याचं समजतंय. कोर्टाच्या बाहेरच हे प्रकरण मिटवण्याची विनंतीही त्यांनी तिच्या कुटुंबीयांकडे केलीय.
दरम्यान, तेहलकाचे एडीटर इन चीफ तरूण तेजपाल यांना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी पीडित मुलीने केल्याचं तिच्या वकिलांनी म्हटलंय. मुलीने पोलिसांत दिलेल्या जबाबाच्या आधारावर तेजपाल यांच्यावर बलात्काराचा खटला नोंदवला जाणार आहे. पीडित तरूणीने तेजपाल यांच्यावर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत, असं तिचे वकील श्याम केसवानी यांनी म्हटलंय. गोवा पोलिसांचं पथक मुंबईत डेरेदाखल झालं आणि त्यांनी पीडित पत्रकार तरुणीचा जबाब नोंदवून घेतला. तत्पुर्वी या प्रकरणाच्या तपास अधिकारी सुनिता सावंत यांनी फोनवरून तरुणीशी चर्चा केली होती. यावेळी पत्रात असलेल्यापेक्षा अनेक वेगळ्या गोष्टी तिनं पोलिसांच्या कानावर घातल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.