हिराखंड एक्सप्रेसचा अपघात नसून घातपात?

जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातामागे घातपात असण्याची शंका व्यक्त होतेय.

Updated: Jan 23, 2017, 06:31 PM IST
हिराखंड एक्सप्रेसचा अपघात नसून घातपात? title=

नवी दिल्ली : जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातामागे घातपात असण्याची शंका व्यक्त होतेय. हिराखंड एक्सप्रेसला झालेल्या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र रुळांना नुकसान पोहचवल्याने किंवा तोडफोड केल्याने अपघात झाल्याची शक्यता रेल्वे मंत्रालयाने नाकारलेली नाही.

शनिवारी रात्री अकराच्या सुमारास जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात आतापर्यंत 41 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 100 हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातामागे घातपात असल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेला अपघात होण्यापूर्वी याच मार्गावरून एक मालगाडी व्यवस्थितपणे मार्गस्थ झाली होती. तसेच ट्रॅकमननेही रेल्वे रुळांची पाहणी केली होती. मात्र हा अपघात होण्यापूर्वी एक्स्प्रेसच्या चालकाने रुळांवर फटाके फुटण्यासारखा आवाज ऐकला होता. त्यामुळे यामागे घातपात असण्याची शक्यता वर्तवली जातेय.. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत.