www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांचे मंगळवारी रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. छत्तीसगड येथे काँग्रेसच्या यात्रेवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.
२५ मे ला छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला. तर विद्याचरण शुक्ल जखमी झाले होते. शुक्ल यांच्यावर नक्षलवाद्यांनी तीन गोळ्या मारल्या होत्या. शुक्ल यांनी अठरा दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.
शुक्ला यांच्यावर गुडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या आधी जगदलपूर रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन तीन गोळ्या बाहेर काढण्यात आल्या होत्या. शुक्ला यांचा जन्म दोन ऑगस्ट १९२९ ला रायपूर येथे झाला होता. त्यांचे वडिल रविशंकर शुक्ला हे स्वातंत्र्यसैनिक होते. विद्याचरण शुक्ला यांनी नागपूर येथील मोईस विद्यालयातून १९५१ मध्ये पदवी संपादन केली होती.
ते १९५७ मध्ये पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून निवडून आलेत. १९६६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान काळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी दूरसंचार, गृह, संरक्षण, अर्थ, नियोजन, संसदीय कार्यमंत्री अशा विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.