नवी दिल्ली : सध्या कॉर्पोरेट जगतातचं लक्ष लागून राहिलेल्या टाटा-मिस्त्री वादात बुधवारी मिस्त्री कुटुंबानं राष्ट्रीय कंपनी लवादात दाखल केलेली अवमान याचिका लवादानं फेटाळून लावली.
सायरस मिस्त्री यांना टाटासन्सच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर टाटा समूहातील इतर कंपन्यांच्या अध्यक्षपदावरूनही बाजूला करण्यात आले. पण मिस्त्री यांच्या कंपनीनं टाटा सन्सच्या निर्णयानं कंपनी लवादाच्या निर्देशांचा अवमान झाल्याचा दावा केला होता.
लवादात याप्रकरणी दोन्ही बाजूच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. अखेर याचिका फेटाळून लवादानं टाटा समूहाची बाजू योग्य ठरवली आहे. दरम्यान, टाटा सन्सनं मिस्त्री यांना हटवण्याचा निर्णय बोर्डाची इमर्जन्सी जनरल मिटींग बोलावून घेतला. अशी मिटींग बोलावण्याचा आणि त्यात अध्यक्षालाच बाजूला करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्याची मुभा लवादाने मिस्त्री यांना दिली आहे.