www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशाच्या तिजोरीतून सर्वाधिक निधी संरक्षण मंत्रालयावर खर्च होतो. त्यानंतर क्रमांक येतो तो ग्रामविकास मंत्रालयाचा. तब्बल 77 हजार कोटींचं बजेट असलेल्या या खात्याची सूत्रं खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी स्वीकारली. विशेष म्हणजे मुंडे यांचे परममित्र असलेले विलासराव देशमुख यांनीही अल्प कालावधीसाठी हे मंत्रालय सांभाळलं होतं.
देशातील 6 लाख खेडेगावांना पाणी, रस्ते आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरवण्याची धुरा आता मुंडे यांच्यावर असेल. पदभार स्वीकारताना विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे आणि मुंडे यांच्या कन्या पंकजा उपस्थित होत्या.
यावेळी मुंडे म्हणाले, ‘भारत खेड्यांनी बनला आहे. मात्र स्वातंत्र्य मिळून 65 वर्षे उलटली तरी खेडेगावच्या माणसांना पाणी, रस्ते आणि शौचालय नसल्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. सर्वाधिक त्रास महिलांना भोगावा लागतो. देशातल्या 2 लाख गावांना पक्के रस्ते नाहीत. ग्रामीण रोजगार निमिर्ती आणि पिण्याच्या पाण्याचा बारमाही पुरवठा यास माझं प्राधान्य असेल.’
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.