कर्नाळा अभयारण्यातून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पोटातून

पनवेल नजीकच्या कर्नाळा अभयारण्यातून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न रखडला होता. यावर तोडगा काढण्यात आलाय. आता चौपदरीकरणाचे काम अभयारण्याच्या पोटातून होणार आहे.

Updated: Jun 3, 2015, 09:38 AM IST
कर्नाळा अभयारण्यातून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पोटातून title=
संग्रहीत

नवी दिल्ली : पनवेल नजीकच्या कर्नाळा अभयारण्यातून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न रखडला होता. यावर तोडगा काढण्यात आलाय. आता चौपदरीकरणाचे काम अभयारण्याच्या पोटातून होणार आहे.

त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या मार्गातील अडथळा ठरलेला कर्नाळा अभयारण्याचा मुद्दा निकाली निघाला आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या थेट पोटातून महामार्गाचे चौपदरीकरण करण्यास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मंगळावारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोकणातील जलद वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.

कोकणच्या विकासाबरोबरच रेल्वे वाहतुकीवरचा ताणही यामुळे कमी होणार आहे. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री व राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे कर्नाळा अभयारण्याच्या पोटातूनच हा चौपदरी महामार्ग जावा या प्रस्तावास याच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने २००९ आणि २०१३ मध्ये परवानगी नाकारली होती.

केंद्रीय वने आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयास दुजोरा दिला आहे. या निर्णयाने मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे कोकणच्या विकासाला चालना मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर या महामार्गावरील पनवेल ते सिंधुदुर्गमधील झारापदरम्यानच्या पट्ट्याच्या कामाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे ४५५ किलोमीटरच्या या टप्प्यासाठी चार हजार कोटी रुपये लागणार आहेत. प्रस्तावित मार्ग हा कर्नाळा पक्षी अभयारण्यातून जातो. त्यामुळे त्याचे चौपदरीकरण करण्याची परवानगी पर्यावरणाच्या निकषावर दोनदा नाकारण्यात आली होती.

या चौपदरीकरणासाठी इको सेन्सिटिव्ह झोनपैकी १.६५ हेक्टर वन जमीन द्यावी लागणार आहे. यापूर्वी अभयारण्याच्या सीमेवरून मार्ग काढण्याचा प्रस्ताव वन्यजीव मंडळाच्या विचाराधीन होता व तसा निर्णयही त्यांनी घेतला होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रस्ताव वाढीव खर्चामुळे नाकारला होता. त्यामुळे या महामार्गाच्या चौपदीकरणात मोठे अडथळे उभे राहिले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.