स्मशानभूमीत तीन वर्षीय मुलानं उघडले डोळे...

तीन वर्षांच्या आपल्या तान्हुल्याला मृत समजून कुटंबीयांनी स्मशानभूमी गाठली... आणि अचानक तिथं या चिमुरड्यानं आपले डोळे उघडले... त्यामुळे कुटुंबीयांच्या आनंदाला पारावारच उरला नाही.

Updated: Sep 22, 2014, 05:42 PM IST
स्मशानभूमीत तीन वर्षीय मुलानं उघडले डोळे... title=

इंदोर : तीन वर्षांच्या आपल्या तान्हुल्याला मृत समजून कुटंबीयांनी स्मशानभूमी गाठली... आणि अचानक तिथं या चिमुरड्यानं आपले डोळे उघडले... त्यामुळे कुटुंबीयांच्या आनंदाला पारावारच उरला नाही.

मध्यप्रदेशात सात दिवसांपूर्वी इंदोरच्या असरावद गावातील कुंदन नावाच्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कुंदन घरात खेळता खेळता अचानक जमिनीवर कोसळला. त्यानंतर एका झटक्यात पुन्हा रडत रडत उठला आणि पुन्हा अचानक त्यानं डोळे बंद केले... अपंग वडील काही करू शकले नाहीत. आईनं शेजारच्यांच्या मदतीनं एमवाय हॉस्पीटलमध्ये त्याला दाखल केलं. 

हॉस्पीटलमध्ये कुंदनवर सहा दिवसांपर्यंत उपचार सुरू होते. त्याच्या तब्येतीमध्ये शनिवारपर्यंत सुधारणा झाली नाही तेव्हा कुटुंबीयांनी त्याला बॉम्बे हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. त्यानंतरही सकाळपर्यंत त्याच्या तब्येतीत सुधारणा दिसली नाही तेव्हा कुटुंबीयांनी आपल्या मर्जीनं त्याचा डिस्चार्ज करून त्याला घरी घेऊन गेले, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

गावाकडे परत जाईपर्यंत या चिमुरड्याच्या परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही. एव्हाना कुटुंबीयांनी त्याला मृत समजलं होतं. त्यांनी कुंदनला सरळ स्मशानभूमित घेऊन जाण्याची तयारी केली. जमिनीत पुरण्यासाठी खोदकामही सुरू झालं. पण, तेवढ्यात मुलाच्या गळ्यातून काही आवाज झाला.... आणि पाहता पाहताच त्याचा श्वास सुरू झाला.

त्यानंतर कुंदनला पुन्हा जवळच्याच एका हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. इथं कुंदनवर पुन्हा उपचार सुरू करण्यात आलेत. सध्या या चिमुरड्यावर उपचार करणाऱ्या डॉ. अनिल गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या मेंदूमध्ये रक्ताचा पुरवठा योग्य पद्धतीनं होत नाहीय. जेव्हा पुरवठा मंद होतो तेव्हा तो मरणासन्न अवस्थेत दिसतो. या आजारावर उपचार खूप कठिण आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.