www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रतन टाटांचं स्वप्न ‘नॅनो’नं साकार केलं... पण, काही काळानंतर आता मात्र नॅनोच्या विक्रीत लक्षणीय घट दिसून आलीय. त्यामुळेच टाटा मोटर्सनं आता याच कारला बजेट कारच्या ऐवजी ‘स्मार्ट सिटी कार’च्या रुपात पुन्हा मार्केटमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेत नॅनोमध्ये अतिरिक्त फिचर्समध्ये पॉवर स्टीअरिंगसोबतच नॅनोमध्ये ‘सीएनजी’चा वापरही करता येणार आहे.
टाटा समूहाचे सध्याचे अध्यक्ष सायरस पी. मिस्त्री यांनी शेअरधारकांच्या ६८ व्या वार्षिक बैठकीत हे जाहीर केलंय. नॅनोचे फिचर्स वाढवण्यावर आता कंपनीचा भर असेल, त्यामुळे हीच कार आता एक स्मार्ट सिटी कार म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
बजेट कार म्हणून ग्राहकांसमोर आलेली नॅनो सध्या मात्र मार्केटमध्ये थंड पडलीय. शोरुममध्ये ग्राहकांची गर्दी खेचून घेण्यात नॅनोला अनेक अडचणी येत आहेत. गुजरातच्या साणंदस्थित नॅनोचा कारखाना आता निम्म्या उत्पादनावर आलाय.
सायरस मिस्त्री यांच्या म्हणण्यानुसार, नॅनोमध्ये पॉवर स्टिअरिंगच्या विकल्पासोबतच या कारची इंधन क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे तसंच यावर्षीच नॅनो सीएनजी स्वरुपात उपलब्ध होऊ शकेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.