www.24taas.com, झी मराठी, मुंबई
नैसर्गिक वायुच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारकडून ‘बदल‘ करण्यात येईल, अशी शक्यता असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.
पेट्रोलियम क्षेत्रामधील वेगवेगळ्या घटकांदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिल्यानंतर ही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र नैसर्गिक वायुच्या किंमतीसंदर्भात करण्यात आलेल्या बदलाची अंमलबजावणी ही 1 जुलैनंतरच होणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर नैसर्गिक वायुची किंमत वाढविली जाण्याची शक्यता आहे.
सी रंगराजन समितीने सुचविलेल्या शिफारशींनुसार नैसर्गिक वायुच्या किंमतीमध्ये वाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासूनच होणे अपेक्षित होते; मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने हा निर्णय लांबणीवर पडला आहे.
""यामुळे नैसर्गिक वायुच्या किंमतीचा निर्णय 1 जुलैपूर्वीच घेतला जाणे आवश्यक आहे. यासंदर्भात सरकारने रिलायन्स उद्योगसमूहास 1 जुलैपूर्वी नैसर्गिक वायुची किंमत बदलली जाऊ शकत नसल्याचे कळविले आहे.
या विषयामध्ये अजून स्पष्टता येणे गरजेचे आहे,‘‘ असे पेट्रोलियम मंत्रालयामधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या निर्णयामुळे घरगुती सिलींडरची किंमत दुप्पट होण्याची शक्यता आहे.
कृष्णा गोदावरी खोऱ्यामध्ये वायुउत्खनन करत असलेली रिलायन्स कंपनी सध्या नैसर्गिक वायुची विक्री प्रतियुनिट 4.2 डॉलर्स प्रमाणे करत आहे.
सत्तेवर येण्याआधी, नैसर्गिक वायुच्या किंमतीचे पुन:पर्रीक्षण केले जाईल असे भाजपने सांगितले होते. मोदी यांच्या सरकारसाठी ही मोठी परीक्षा मानली जात आहे. यामुळे आता नैसर्गिक वायुच्या नव्या किंमतीसंदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.