अपडेट: राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ, सुषमा स्वराज देणार उत्तर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ललित मोदी प्रकरणावरुन राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्यानं राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावं लागलंय. 

Updated: Jul 21, 2015, 07:41 PM IST
अपडेट: राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ, सुषमा स्वराज देणार उत्तर  title=

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ललित मोदी प्रकरणावरुन राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्यानं राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावं लागलंय. 

जोपर्यंत सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजेंची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय. तर सुषमा स्वराज लवकरच याबाबत उत्तर देणार असल्याचं अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितलंय. 

फरार आरोपीला सुषमा स्वराज यांनी मदत केली आणि यावर पंतप्रधान गप्प का असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याची झलक बघायला मिळाली. लोकसभेत निधन झालेल्या माजी खासदारांना श्रद्धांजली अर्पण करत दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. तर राज्यसभेचं कामकाज सुरु होताच काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी ललित मोदी प्रकरण मांडलं. 

एका फरार आरोपीला सुषमा स्वराज यांनी ट्रॅव्हल डॉक्यूमेट मिळवून देण्यात मदत केली, आता याच डॉक्यूमेंटच्या आधारे ललित मोदी परदेशात मजा करत आहेत असा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकरणावर नरेंद्र मोदी गप्प का, त्यांची सर्व आश्वासनं खोटी ठरत आहेत अशी घणाघाती टीकाही आनंद शर्मा यांनी केली. 

केंद्र सरकारतर्फे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत भूमिका मांडली. आम्ही या मुद्द्यावर चर्चेला तयार असून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या स्वतः या प्रकरणावर स्पष्टीकरण देतील, असं अरुण जेटलींनी सांगितलं. मात्र यानंतरही विरोधकांनी गदारोळ सुरुच ठेवल्यानं दुपारी १२ आणि नंतर २.३० वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.