‘इंटरनेटवर हल्ला झालाच नाही, केबल तुटली होती’

इंटरनेट स्पॅमच्या जाळ्यात सापडल्यानं नेट डाऊन झालं नव्हतं तर ते डाऊन झालं होतं, केबल तुटल्यामुळे असं स्पष्टीकरण केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 30, 2013, 12:42 PM IST

www.24taas.com, मुंबई
गेली दोन दिवस इंटरनेटवर हल्ला झाल्याच्या बातमीनं अनेक जण चक्रावले होते. त्यातच अनेकांचं नेट डाऊन असल्यानं चिंतेत आणखीनच भर पडली. पण, इंटरनेट स्पॅमच्या जाळ्यात सापडल्यानं नेट डाऊन झालं नव्हतं तर ते डाऊन झालं होतं, केबल तुटल्यामुळे असं स्पष्टीकरण केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी दिलीय.
भारत आणि युरोपला जोडणारी सबमरीन नेट केबल समुद्रातून गेली आहे. ही केबल जागो जागी कापली गेली आहे. त्यामुळे ‘नेट कनेक्शन’मध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा फटका देशातील कोट्यवधी नेटीझन्सना बसलाय. ही परिस्थिती आणखी दोन आठवडे तरी जैसे थे राहणार आहे, असं सिब्बल यांनी म्हटलंय.

केबल दुरुस्तीचे काम ‘भारती एअरटेल’ कंपनीला देण्यात आलंय. कंपनीचे अभियंते आणि तंत्रज्ञ युद्धपातळीवर दुरुस्तीच्या कामाला लागलेत. सध्या डेटा ट्रॅफिक अन्य मार्गांवरून वळविण्यात आली असली तरी काम पूर्ण होण्यास किमान दोन आठवडे लागतील. तोपर्यंत नेट मंदगतीच राहणार असल्याचं ‘भारती एअरटेल’च्या सूत्रांनी माहिती दिलीय.