कानपूर : कानपूरमध्ये नात्यांवरचा विश्वास उडून जाईल अशी घटना उघडकीस आलीय. कानपूरचा अरबपती बिस्किट व्यापारी पीयूष श्यामदेवानी यानं त्याच्या पत्नीच्या हत्येची कबुली दिलीय. पीयूष याची पत्नी ज्योती हिची सोमवारी पहाटे हत्या झाल्याचं समोर आलं होतं.
आपल्या पत्नीची हत्या झाल्याची पोलिसांना माहिती पीयुषनंच दिली होती. ज्योती आणि आपणं रात्री जेवण करण्यासाठी निघालो असता काही जणांनी तिचं अपहरण केल्याचं पीयुषनं पोलिसांना सांगितलं होतं. सोमवारी पहाटे ज्योति हिचं शव तिच्याच गाडीमध्ये सापडलं होतं.
परंतु, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनाच धक्का बसेल अशा काही गोष्टी समोर आल्या... पोलिसांना या प्रकरणात अगोदरपासूनच पीयुषवर संशय होता. कसून चौकशी केल्यानंतर अवैध संबंधांमुळे पीयुषनं आपल्या पत्नीच्या हत्येची कबुली दिली. यामध्ये पीयुषला त्याच्या ड्रायव्हरनंही मदत केल्याचं समोर आलंय.
का झाली हत्या....
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयुषचे पत्नीशिवाय इतर अनेक मुलींशी अनैतिक संबंध होते. हत्येच्या दिवशी पीयूष आणि त्याची कथित गर्लफ्रेंडमध्ये जवळपास 150 मॅसेज एक्सचेंज झाले होते. जेव्हा पोलिसांनी पीयूष आणि त्याच्या गर्लफ्रेंडची समोरासमोर बसवून चौकशी केली तेव्हा अखेर पीयूषनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांचा संशय खरा ठरला
ज्योती आणि पीयूषनं या रेस्टोरंटमध्ये डिनर घेतला होता तिथलं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी काढलं. त्यानंतर पोलिसांचा संशय पीयूषवर बळावला.
कानपूर झोनचे आयजी आशुतोष पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूषचा रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना सीसीटीव्हीमध्ये दिसलेला टी शर्ट आणि पोस्टमॉर्टेमच्या वेळी घातलेला टी शर्ट वेगळा होता. तसंच रेस्टॉरंटमध्ये जेवत असताना ज्योती आणि पीयुषमध्ये संवाद झाला नव्हता तर पीयूष सलग फोनवरच बोलत होता, असं पोलिसांच्या लक्षात आलं होतं.
ज्योतीचं अपहरण करताना काही जणांनी आपल्याला मारहाण केल्याचं पीयुषनं म्हटलं होतं, पण पीयुषच्या शरीरावर कोणत्याही खुणा नव्हत्या. तसंच पीयुषनं पोलिसांना अपहरणाची सूचना देण्यासाठी जवळपास एक तासांचा वेळ घेतला होता... आणि मुख्य म्हणजे पीयुषकडे यावेळी फोनही होता आणि 500 मीटरच्या अंतरावरच एक पोलीस चौकीही होती... पीयुषच्या जबाबातही एकवाक्यता नव्हती... या सगल्या गोष्टी ध्यानात घेतल्यानंतर पोलिसांचा पीयुषवर संशय अधिकच बळावला होता.
कशी झाली हत्या...
सूत्रांच्या माहितीनुसार, पीयुषनं आपल्या ड्रायव्हरच्या मदतीनं हे हत्याकांड घडवून आणलं. ड्रायव्हरनंही या हत्याकांडासाठी भाडोत्री गुन्हेगारांची मदत घेतली होती. या प्रकरणात चार-पाच जणांचा समावेश असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार पीयुषनं या ड्रायव्हरला काही दिवसांपूर्वीच नोकरीवर ठेवलं होतं. याच नोकराला काही कारणांमुळे नोकरीवरून बरखास्त करण्यात आलं होतं. पण, पीयुषनंच त्याला पुन्हा नोकरीवर ठेवलं होतं. हत्येनंतर ड्रायव्हर फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.