श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील नौगाम सेक्टर येथे घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडलाय. यात घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.
शनिवारी संध्याकाळी नौगाम परिसरात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत रोखलं. मात्र, या चकमकीत भारताचे दोन जवान देखील शहीद झालेत.
दरम्यान, सीमा रेषेवर अद्यापही ऑपरेशन सुरू आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील कुपवाडा येथील नौगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला.
दहशतवाद्यांची ही घुसखोरी रोखण्यासाठी त्यांच्या हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देत जवानांनी गोळीबार केला, ज्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात त्यांना यशदेखील आले.
मात्र, दुसरीकडे दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकी दरम्यान लष्कराचे दोन जवान शहीद झालेत.