बुरहान वानीच्या भावाच्या मृत्यूची कुटुंबियांना मिळणार नुकसान भरपाई

जम्मू - काश्मीर सरकारनं खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये मारल्या गेलेल्या १७ जणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलीय. या लोकांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याच्या भावाचाही समावेश आहे. औपचारिक आदेश जारी करण्याअगोदर याविरुद्ध आक्षेप नोंद करण्यासाठी आठवड्याभराची मुदत देण्यात आलीय. 

Updated: Dec 14, 2016, 12:39 PM IST
बुरहान वानीच्या भावाच्या मृत्यूची कुटुंबियांना मिळणार नुकसान भरपाई title=

श्रीनगर : जम्मू - काश्मीर सरकारनं खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये मारल्या गेलेल्या १७ जणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलीय. या लोकांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याच्या भावाचाही समावेश आहे. औपचारिक आदेश जारी करण्याअगोदर याविरुद्ध आक्षेप नोंद करण्यासाठी आठवड्याभराची मुदत देण्यात आलीय. 

यावर्षी ८ जुलै रोजी दक्षिण काश्मीरच्या कोकेरनाग भागात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत बुरहान वानी मारला गेला. त्यानंतर खोऱ्यात रोष उसळला यानंतर जवळपास ८६ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

पुलवामाच्या उपायुक्तांकडून सोमवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, दहशतवादी घटनांमध्ये मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांना जिल्हास्तरीय चौकशी सहसल्लागार समितीनं (डीएलएससीसी) नुकसान भरपाईला मंजुरी दिलीय. यामध्ये, समावेश असलेल्या नावांमध्ये बुरहान वानीचा भाऊ खालिद मुजफ्फर वानी याच्याही नावाचा समावेश आहे. १३ एप्रिल रोजी त्रालच्या बुचू वनक्षेत्रात सुरक्षा दलानं केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबाला जवळपास चार लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकते. 

सेनेच्या म्हणण्यानुसार, खालिद हादेखील हिजबुल मुजाहिद्दीनशी निगडीत होता. परंतु, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, त्याचा दहशतावादशी कोणताही संबंध नव्हता. २५ वर्षीय खालिद इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. 

उपायुक्तांनी या नावांवर आक्षेप असल्यास त्याची नोंद करण्याचे आदेश दिलेत. आदेश जारी होण्यापूर्वी सात दिवस अगोदरपर्यंत हे आक्षेप नोंदवता येतील. 

जाहीर करण्यात आलेल्या नावांमध्ये व्याख्याता शब्बीर अहमद मांगू याच्या नावाचाही समावेश आहे... यावर्षी १७ ऑगस्ट रोजी पुलवामाच्या ख्रेवमध्ये सेनेच्या जवानांकडून कथितरित्या मारहाणीनंतर त्याचा मृत्यू झाला होता.