रक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी म्हणाले, "मला १४० आमदारांचा पाठिंबा होता, पण सभागृहातील रक्तपात टाळण्यासाठी मी आपल्या पदाचा राजीनामा देतोय." माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता, असं मांझी म्हणाले.

Updated: Feb 20, 2015, 05:48 PM IST
रक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी title=

पाटणा: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी म्हणाले, "मला १४० आमदारांचा पाठिंबा होता, पण सभागृहातील रक्तपात टाळण्यासाठी मी आपल्या पदाचा राजीनामा देतोय." माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता, असं मांझी म्हणाले.

माझ्यामागे असलेल्या अनेक मंत्र्यांना धमक्यांचे फोन आले होते, मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार जनता दलानं केला आहे, असा गौप्यस्फोटही मांझींनी केला. नितिशकुमार यांनी मला मुख्यमंत्री केले परंतु मी तर केवळ प्यादं होतो आणि नितिशकुमारांना हव्या असलेल्या बदल्या होत होत्या, नियुक्त्या होत होत्या, मंत्रिमंडळाचे निर्णय झाले, असा गौप्यस्फोट पत्रकार परिषदेत मांझी यांनी केला. 

नितिशकुमार यांच्या भोवताली असलेल्या काही नेत्यांनी पैशाच्या आणि गुंडगिरीच्या जोरावर सगळा खेळ रचल्याचं सांगत, चांगलं काम करण्याची संधी मला मिळालीच नसल्याचं सांगितलं. दलित लोक विकासाची कामं करू शकत नाहीत, त्यांच्यात पात्रताच नाही अशा वावड्या पक्षातल्याच काही लोकांनी उठवल्या आणि मला काम करण्यास अटकाव करण्यात आल्याचं मांझी म्हणाले.

नितिशकुमार माझ्या मनात आदरस्थानी होते. परंतु तेही लोकांच्या बहकाव्यात आल्याचा आरोप मांझी यांनी केला आहे. जितनराम मांझी चांगलं काम करत नसेल तर माझ्या तोंडावर सांगायचं मी लगेच राजीनामा दिला असता. परंतु, द्रौपदीचं चिरहरण झालं त्यावेळी भीष्म पितामह जसे बघत राहिले त्याप्रमाणेच नितिशकुमार माझा अपमान बघत राहिले असं मांझी म्हणाले. मला काढून नितिशकुमारांना मुख्यमंत्री करण्याचे शरद यादव यांनी सांगितलं. माझ्याशी आणि माझ्या पाठिराख्यांशी जनता दलाचे नितिशकुमारांच्या भोवती असणारे काही नेते अत्यंत हीन दर्जाचे वागले असल्याची टीका मांझी यांनी केली आहे. मात्र, अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यावर हिंसाचार टाळण्यासाठी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाता राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं जितनराम मांझी यांनी सांगितलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.