बंगळुरु : तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना बेहिशेबी संपत्तीप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना याबाबत लवकरच शिक्षा होईल, असे सांगण्यात येत आहे.
अठरा वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागण्याच्या पार्श्वभूमीवर बंगळुरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परप्पन अग्रहारच्या आवारातील गांधी भवनात निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी जयललिता यांना दोषी ठरविण्यात आले. निकाल ऐकण्यासाठी जयललिता आज सकाळी चेन्नईहून बंगळूरमध्ये दाखल झाल्या. त्यांच्यावरील निकालाच्या सुनावणीवेळी पोलिस आणि अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांमध्ये वादही झाला.
विशेष न्यायाधीश जॉन मायकल कुन्हा यांनी निकाल जाहीर केला. या प्रकरणासंबंधी २८ ऑगस्टला युक्तिवाद पूर्ण करण्यात आला होता. २० सप्टेंबरला निकाल जाहीर होणार असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले होते. मात्र जयललिता यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने बंगळुरात आवश्यक सुरक्षाव्यवस्थेसाठी काही दिवसांची मुदत देण्याची मागणी पोलिस आयुक्तांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर न्यायालयाने २७ सप्टेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
निकाल जाहीर करण्यात येत असल्यामुळे या प्रकरणातील सर्वांना सक्तीने न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह त्यांचे दत्तकपुत्र व्ही. एन. सुधाकरन, मैत्रीण शशिकला, तसेच शशिकला यांची नणंद जे. इलवरसी यांच्यासह न्यायालयात उपस्थित होते.
जयललिता यांनी १९९१ मध्ये मुख्यमंत्रिपदावर येण्यापूर्वी ३ कोटींची मालमत्ता जाहीर केली होती. आपल्या सत्ता काळात त्यांनी दर महिन्याला केवळ एक रुपया मानधन घेतले. मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडे ६५.८६ कोटींची मालमत्ता असल्याचे उघड झाले.
यामध्ये २८ किलो सोने, १२ हजार साड्या, ३२ कंपन्या, अनेक ठिकाणी जमीन, शंभरहून अधिक बॅंक खाती त्यांच्या नावे असल्याचे चौकशीवेळी उघड झाले होते. १८ सप्टेंबर 1१९९६ रोजी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्यानंतर तपास करून १९९७ मध्ये दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.