`विक्रांत` भंगारात! ६० कोटींना लिलाव...

आयएनएस विक्रांतची लिलावामध्ये ६० कोटींना विक्री करण्यात आल्याची माहिती नौदलातल्या सूत्रांनी दिलीय. `पीटीआय`नं याबाबतचं वृत्त दिलंय.

Updated: Apr 9, 2014, 01:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयएनएस विक्रांतची लिलावामध्ये ६० कोटींना विक्री करण्यात आल्याची माहिती नौदलातल्या सूत्रांनी दिलीय. `पीटीआय`नं याबाबतचं वृत्त दिलंय.
लिलावामध्ये आयबी कमर्शियलनं आयएनएस विक्रांत विकत घेतलीय. लिलावाची ही प्रक्रिया गेल्या आठवड्यात पूर्ण झाल्याचं, सूत्रांनी म्हटलंय. लिलावाचे पैसे अदा केल्यानंतर तीस दिवसांत कंपनीकडून `विक्रांत` नेव्हल डॉकयार्ड इथून नेण्यात येईल.
भारतीय नौदलाने १९७१ च्या युद्धात अरबी समुद्रात पाकिस्तानची कोंडी करणारी `आयएनएस विक्रांत` जानेवारी १९९७ मध्ये सेवेतून निवृत्त करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नांनंतर नौदलाने `आयएनएस विक्रांत`चे संग्रहालयात रुपांतर केले होते. भारताच्या नौदल सामर्थ्याची झलक दाखवणारे प्रदर्शन `विक्रांत`वर तयार करण्यात आले होते. दरवर्षी नौदल सप्ताह तसेच शाळांना सुट्या पडल्यावर हे प्रदर्शन खुले केले जात होते. समुद्रातल्या या प्रदर्शनाची तसेच `विक्रांत`ची देखभाल करण्यावर होणारा खर्च वाढू लागला होता. या खर्चाला राज्य सरकारने कायमस्वरुपी मोठा हातभार लावावा, अशी विनंती नौदलामार्फत वारंवार केली जात होती. मात्र आर्थिक अडचणींचे कारण देत सरकारकडून मदत देण्यास टाळाटाळ झाली. राज्य सरकारनं गेल्या १७ वर्षांत `आयएनएस विक्रांत` युद्धनौका संग्रहालयात रुपांतरीत करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. ११ डिसेंबर २०११ रोजी सरकारनं संग्रहालयाचा प्रस्ताव परत घेतला होता.
परिणामत: नौदलाने नियमानुसार निवृत्त केलेले जहाज भंगारात काढण्याचा निर्णय घेतला. ऐतिहासिक १९७१ च्या युद्धाची साक्षीदार असलेल्या विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिकाही हायकोर्टात फेटाळण्यात आली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.