नवी दिल्ली : पत्नीची इच्छा नसतांना ही तिला शरीर सुखाची मागणी केली तर यासंबंधित केंद्र सरकार नवा कायदा तयार करण्याचा विचार करत आहे. पत्नीची इच्छा नसतांना देखील शरीर सुखासाठी जबरदस्ती केली तर त्याच्यावर वैवाहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी नवा गुन्हा दाखल करणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी म्हटलं आहे.
मनेका गांधी यांनी महिन्याभरापूर्वी जेव्हा संसदेत वैवाहिक बलात्काराच्या या नव्या कायद्यासंबंधित विषय आला तेव्हा सध्या ही संकल्पना लागू करणे योग्य होणार नाही असं म्हटलं होतं पण 'बेटी बचाव बेटी पढाव' ही केंद्र सरकारची मोहीम देशातील आणखी ६१ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना मनेका गांधी यांनी महिन्याभरापूर्वी केलेल्या वक्तव्यावरुन घुमजाव केला. 'वैवाहिक बलात्कार' हा कायदा करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'निरक्षरता, गरिबी, पिढीजात यामुळे घट्ट होत गेलेल्या सामाजिक प्रथा, नीतीमूल्य, धार्मिक श्रद्धा आणि विवाहाला पवित्र बंधन मानण्याची समाजाची मानसिकता यासारख्या विविध कारणांवरून 'वैवाहिक बलात्कार' हा गुन्हा लागू करणे योग्य होणार नाही असं मत मनेका गांधी यांनी संसदेत मांडलं होतं. यावरुन संसदेत बराच गोंधळ झाला. जर अशा प्रकारच्या तक्रारी करण्यास महिला पुढे आल्या तर वैवाहिक बलात्कार हा गुन्हा तयार करण्यासाठी भर दिला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.