www.24taas.com, नवी दिल्ली
नवी दिल्लीत बलात्काराच्या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका खासगी बसमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर रविवारी रात्री सामूहिक बलात्कार (गॅंग रेप) झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.
पीडित मुलीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पिडित विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर आहे. मुर्निका येथून पीडित मुलगी आणि तिचा एका मित्र काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका खासगी बसमध्ये बसले. द्वारका येथील मुलीच्या निवासस्थानी तिला सोडण्यासाठी तिचा मित्र सोबत आला होता. यावेळी बसमधील पाच जणांनी मुलाला जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांनी मुलीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर दोघांनाही गाडीतून बाहेर फेकण्यात आले.
बलात्कार करणारे सहप्रवासी होते की बसचे कर्मचारी याबाबत माहिती मिळालेली नाही. मुलीच्या मित्राने रात्री १.२५ वाजण्याच्या सुमारास वसंत विहार पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली.
बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पीडित मुलगी आणि तिच्या मित्राचे कपडे काढून त्यांना बसमधून बाहेर ढकलून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.