www.24taas.com, नवी दिल्ली
एअर होस्टेस गीतिका शर्मा प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. शुक्रवारी गितीकाच्या आईनं – अनुराधा शर्मा यांनी - राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलीय. गीतिकाला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप असलेल्या हरियाणाच्या माजी मंत्री गोपाळ कांडा आणि अरुणा चढ्ढा यांनाच पोलिसांनी आता गीतिकाच्या आईच्या आत्महत्येप्रकरणीही जबाबदार धरलंय. आज गीतिकाच्या आईचं पोस्टमॉर्टेम होणार आहे.
जवळपास ५० वर्षांच्या अनुराधा शर्मा यांनी शुक्रवारी अशोक विहारमधील राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. गीतिकाचे मामा आणि गीतिका प्रकरणाबाबतची केस लढत असलेल्या वकीलानेही या घटनेला दुजोरा दिला असून, गीतिकाची आई अनुराधा शर्मा यांनी आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे. अनुराधा शर्मा यांचे शरीर घरातील सिलिंग फॅनला लोबकळत असल्याचे दिसून आले. तेथे सुसाईड नोट सापडली असून त्यात म्हटले आहे की, गोपाल कांडा आणि अरुणा चड्ढा यांनी आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं गीतिकाच्या आईनं लिहून ठेवलंय. गीतिकाच्या आत्महत्येचा गीतिकाच्या आईला चांगलाच धक्का बसला होता.
‘गीतिकाच्या आत्महत्येनंतर कांडा आणि त्याचे सहयोगी शर्मा परिवारावर दबाव टाकत होते. कांडानं माझ्या मुलीला मारलं होतं, आता त्यानं माझ्या पत्नीचाही जीव घेतलाय’ असं म्हणत गीतिकाच्या वडिलांनी कांडावर गंभीर आरोप केलेत.
कांडा याच्या त्रासाला कंटाळून २३ वर्षांच्या एअर होस्टेस असलेल्या गीतिकानं जवळजवळ सहा महिन्यांपूर्वी ५ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. कांडाकडून प्रतारणा झाल्यानं कंटाळून तीनं आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. या प्रकरणात कांडा अजूनही तिहार जेलमध्ये बंद आहे. गीतिका कांडाच्या एमडीएलआर एअरलाईन्समध्ये एअर होस्टेसच्या पदावर कार्यरत होती. सध्या ही कंपनी बंद झालीय. पोलिसांच्या चौकशीत, गीतिका आणि तिचा परिवार कांडा आणि त्याच्या पत्नीशी चांगलेच परिचित असल्याचंही उघड झालं होतं. कांडा गीतिकाच्या परिवाराबरोबर अनेक ठिकाणी फिरतानाही आढळला होता.