चंदीगढ : पंजाबचे माजी मुख्यमंत्री तसंच तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी राज्यपाल सुरजीतसिंग बरनाला यांचं निधन झालंय, ते 91 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बरनाला यांना चंदीगढच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.
1985 ते 1987 दरम्यान ते पंजाबचे मुख्यमंत्री होते. 2001 ते 2011 या कालावधीत त्यांनी तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचं राज्यपालपदही भूषवलं. 1942च्या चले जावच्या स्वातंत्र्य चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता.
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांनी बराच काळ कायद्याची प्रॅक्टिसही केली होती. मात्र साठच्या दशकात ते राजकारणात सक्रीय झाले. 1952 साली झालेल्या निवडणुकीत त्यांना अवघ्या चार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. बरनाला यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींसह विविध पक्षाच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केलंय.