लखनऊ : देशात मुलींच्या प्रश्नांवर विविध चर्चा घडत आहेत. सरकारतर्फे मुलींसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. एकाबाजूला हे आशादायक चित्र असताना दुसऱ्या बाजूला मात्र परिस्थिती भीषण आहे. संसदेत सर्वात जास्त जागा असणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यात अशा काही जागा आहेत, जिथे लग्नाच्या नावाखाली मुलींचा लिलाव केला जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे हा लिलाव काही टोळ्या करत नसून खुद्द मुलींचे कुटुंबीयच करत आहेत. 'न्यूज२४' या वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा धक्कादायक खुलासा झाला आहे. ३०,००० रुपये इतक्या कमी किंमतीला हा लिलाव होत आहे. यातील अनेक मुली तर १८ वर्षांपेक्षाही कमी वयाच्या आहेत.
या घरांमधील पुरुष व्यक्ती आपल्या मुलींचा सौदा करतात. घरातील महिलांना यासंबंधी हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतो. लग्नाच्या आधीच मुलीच्या घरच्यांना ही रक्कम दिली जावी, अशी अट घातली जाते. विशेष म्हणजे या गावागावांतील पोलिसांना याविषयी पूर्ण कल्पना असूनही ते कोणतीही कारवाई करत नाहीत.