हैदराबाद : बाबा रामदेव यांच्या पतंजली उत्पादनांची बाजारात चलती असताना आता त्यांच्या नावाने बनावट उत्पादनंही बाजारात दाखल झाल्याचं समोर येतंय. नुकतीच हैदराबाद पोलिसांनी 'पतंजली' ब्रँडच्या नावाने उत्पादन करणाऱ्या एका टोळीचे कारनामे उघड केले आहेत.
'सैदराबाद स्पेशल ऑपरेशन टीम'ने हैदराबादमधील अलवल भागात पतंजलीच्या नावाने नूडल्स तयार करणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकला. पोलिसांच्या मते त्यांना याठिकाणी दिसलेले सत्य फार भीषण होते. नूडल्स तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मैदा आणि पीठ यांची एक्सपायरी डेटही उलटून गेली होती.
या कारखान्यावर छापा टाकला तेव्हा तिथे एक कर्मचारी उपस्थित होता ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या कारखान्याचा मालक सध्या फरार आहे. या कारखानदाराकडे अशा प्रकारचा व्यवसाय करण्याचा कोणताही परवानाही नाही.
'डेक्कन क्रॉनिकल' वृत्तातील एका बातमीनुसार या बनावट नूडल्स बाजारात उपलब्ध असणाऱ्या खऱ्या नूडल्सपेक्षा २-३ रुपयांनी स्वस्तात उपलब्ध आहेत. त्यामुळे आजवर अनेक ग्राहकांनी त्या विकत घेऊन खाल्ल्याही आहेत. या आधीही अशाप्रकारचे छापे मारण्यात आले. मॅगी नूडल्सच्या बाजारातील एक्झिटनंतर पोकळी भरुन काढण्यासाठी अशाप्रकारच्या बनावट नूडल्स बनवून विकण्याचे पेव फुटले आहे.