www.24taas.com, नवी दिल्ली
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी पाकिस्तानला स्पष्टपणे समज दिलीय. भारत पाकिस्तानबरोबर मैत्रीसाठी एक पाऊल पुढे टाकायला तयार आहे पण, पाकिस्ताननं मात्र याला भारताचा दुबळेपणा समजू नये, असं म्हणत राष्ट्रपती मुखर्जी यांनी भारताला गृहीत न धरण्याची समज पाकला दिलीय. म्हटलंय. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ते देशवासियांना संबोधित करत होते.
यावेळी मुखर्जी यांनी जम्मू-काश्मिरात सीमारेषेवर दोन जवानांच्या क्रूर हत्येचाही उल्लेख केला. एका भारतीय जवानाचे शिर कापून नेण्याची पाकिस्तानची कृती नृशंस असल्याचं मुखर्जी यांनी म्हटलंय. ‘शेजारी राष्ट्रांशी मतभेद असू शकतात, सीमेवर तणावही असू शकतो. मात्र, दहशतवाद्यांच्या माध्यमातून हिंसाचाराला खतपाणी घालणं ही गंभीर बाब आहे. भारताला सीमेवर शांतता हवी आहे. त्यामुळेच आम्ही नेहमी मैत्रीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आमचा हा पुढाकार म्हणजे आमचे दुबळेपण आहे, असे कुणीही समजू नये’ असं म्हणत राष्ट्रपतींनी पाकला सज्जड दम दिलाय.
यासोबतच, राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात दिल्ली गँगरेप प्रकरणाचाही उल्लेख केला. ‘देशाच्या राजधानीत घडलेल्या दुर्घटनेनं आम्हाला हेलावून टाकलेलं असताना अशा परिस्थितीत मी राष्ट्राला संबोधित करत आहे. एका मुलीसोबत अत्यंत क्रूरतेनं दुष्कृत्य झालं... तिची हत्या करण्यात आली... ती उदयोन्मुख भारताच्या आकांक्षांचे प्रतीक होती. आम्ही एका जिवापेक्षाही एक स्वप्न गमावलं आहे’ असे उद्गार त्यांनी काढलेत.
‘आम्ही दुसऱ्या पिढीच्या बदलाच्या उंबरठ्यावर आहोत. तरुणांच्या मनात आज अनेक शंकांनी घर केले आहे. तांत्रिक कौशल्याला समान संधी मिळते का? या आणि अन्य शंकांचे निरसन झालेच पाहिजे. युवा उपाशीपोटी स्वप्न पाहू शकत नाही. त्याला त्याच्या आणि राष्ट्राच्या महत्त्वाकांक्षाची पूर्तता करण्यासाठी रोजगार हवा आहे. आर्थिक विकासाचा लाभ ही भाग्यशाली लोकांचीच मक्तेदारी नको’ असंही राष्ट्रपतींनी यावेळी म्हटलंय.