ठाणे : डोंबिवलीकरांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर एसटी महामंडळाने पूर्ण केली आहे. आजपासून डोंबिवलीहून पुण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी सात वाजता डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातून एसटीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
डोंबिवलीत अनेक पुणेकर स्थायिक झाले आहेत. पुण्याला जायचं झाल्यास ठाणे किंवा कल्याणहून रेल्वेनं किंवा कल्याण अथवा विठ्ठलवाडी आगारातून बसने हा प्रवास करावा लागतो. इतक्या वर्षांत थेट पुण्यासाठी बस सेवाच उपलब्ध नसल्यानं डोंबिवलीकरांमध्ये काहीशी नाराजी होती. अखेर आज सकाळी एसटीची पहिली बस डोंबिवलीतून रवाना झाली. यावेळी नागरिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी बसचं स्वागत केलं. प्रवाशांना पेढे वाटून चालक आणि वाहकाचाही सत्कार करण्यात आला. या बसमुळे मोठी गैरसोय दूर झाल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. या बसला चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात शिवनेरी बस सुरू करण्याचे प्रयत्न करू असं मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.