www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीत पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या अमानुष बलात्कारानंतर संतप्त नागरीक रस्त्यावर उतरलेत. पोलीस मुख्यालयावर जोरदार निदर्शनं सुरू आहेत.
मुख्यालयासमोर उभारलेली बॅरिकेडस तोडून आंदोलकांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मागितलेली लाच, आंदोलक तरुणीला केलेली मारहाण आणि एकूणच तपासात झालेली दिरंगाई याचा रोष लोकांच्या मनात आहे. गुन्हेगारांना कोणाचाही धाक उरलेला नाही, दिल्लीत कायद्याचं राज्य उरलेलं नाही, अशा घोषणा आंदोलक देताना दिसत आहेत. आंदोलनाची धग केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या घरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्यानं तिथली सुरक्षा वाढवण्यात आलीय.
दरम्यान, दिल्लीमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या मनोजकुमार या नराधमाला अटक करण्यात आलीय. बिहारमधल्या मुझ्झपरनगर जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आलीय. पीडित चिमुरडीची प्रकृती स्थीर असल्याचं एम्सच्या डॉक्टरांनी सांगितलंय. काही वेळापूर्वीच तिचं मेडिकल बुलेटीन सादर झालं. मुलगी शुद्धीत असून औषधांना योग्य प्रतिसाद देत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
घटनेचा राष्ट्रपतींना तीव्र धक्का
दिल्ली बलात्कार प्रकरणी आपल्याला अतीव धक्का बसल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी कडक उपाय योजण्यात येतील आणि या घटनेतल्या दोषींना लवकरात लवकर शिक्षा ठोठावण्यात येईल, अशी ग्वाही राष्ट्रपतींनी दिलीय. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी थोड्याच वेळात एम्सला भेट देण्याची शक्यता आहे. बलात्कार पीडित चिमुरडीला लवकर आराम वाटावा, अशी प्रार्थना देशभरात केली जातेय. अहमदाबादमध्ये शाळेतल्या लहानग्यांनी मुलीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली, तर भोपाळमध्ये यज्ञ करण्यात आला.