रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीमध्ये दुफळी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांची ६ वर्षासाठी हकालपट्टी केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या राजकारणाच्या आखाड्यात यादवांमध्येच दंगल सुरू झाली आहे.
बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है... दंगल चित्रपटातील हे गाणे सध्याच्या उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थितीत मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील ताणलेल्या संबंधांना साजेशं ठऱतंय.
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या असतानाच पुन्हा एकदा समाजवादी पक्षात यादवी माजली आहे. मुलायम सिंग यादव यांनी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतरही पूत्र अखिलेश यादव यांनी २३५ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात मुलायमसिंग यांनी निवडलेल्या ३१ उमेदवारांवर फुली मारली. त्यामुळे पक्षप्रमुख असलेल्या मुलायमसिंग यादव यांना मुलाकडूनच आव्हान मिळाले. अखिलेश आणि मुलायमसिंह यांच्यात तणावासाठी सर्वात कळीचा मुद्दा ठरला तो म्हणजे मुलायम यांची सून आणि प्रतिक यादव यांच्या पत्नी अपर्णा यादव यांचे नाव अखिलेश यादव यांनी कापले. अपर्णा यादव या शिवपाल गटाच्या असून मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून अपर्णा यादव यांच्याकडे पाहिले जात आहे.
अपर्णा यादव, - सून
अमनमणी त्रिपाठी,
अतीक अहमद,
गायत्री प्रसाद - राष्ट्रीय सचिव
राकेश वर्मा - बेनी प्रसाद वर्मा यांचे पूत्र
अखिलेश यादव म्हणजे विकास आणि पारदर्शकतेचा चेहरा म्हणून लोकांत प्रसिद्ध होते. परंतू , अखिलेश यांच्या यादीत माफियांना तिकीट देण्यात आल्यामुळे त्यांच्यावर टिका होऊ लागली.
राममूर्ती वर्मा - पत्रकाराची हत्याचा आरोपी
महेंद्र कुमार सिंह - डान्सबारमध्ये हाणामारी केली
रविदास मल्होत्रा - १५ गुन्ह्याच्या केसेस
इरफान सोलंकी - डाॅक्टरांना मारहाणाचा गुन्हा
मनोज पारस - बलात्कारातील आरोपी
अखिलेश आणि मुलायमसिंह यादव यांनी वेगेवगळा सर्वे केला. त्यावरूनच उमेदवारी जाहीर केली. पाहू या काय फरक आहे दोघांच्या यादीत...
मुलायम यांची यादी अखिलेश यांची यादी
नाव 325 235
विद्यमान आमदार 176 171
मंत्री 30 36
मुलायम गटातील 88 65
अखिलेश गटातील 56 110
शिवपाल गटातील 164 60
आरोपी उमेदवार 77 38
यादव-मुस्लिम 114 56
सवर्ण 63 31
अखिलेश यादव यांनी यादी जाहीर केल्यानंतर मुलायमसिंह यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर, रामगोपाल यादव १ जानेवारी रोजी लखनऊ येथे राष्ट्रीय अधिवेशन बोलविले आहे. परंतू पक्षाची परवानगी न घेता अधिवेशन बोलवल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. अखिलेश आणि रामगोपाल दोघांनीही पक्षाच्या नियमांचे पालन केले नसल्यामुळे ६ वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबातील या यादवीमुळे आता पुढे पेच निर्माण झाले आहेत.
पाहू या काय आहेत अडचणी...
१. अखिलेश यादव यांची हकालपट्टी केल्यामुळे मुख्यमंत्री कोण
२. विधानसभेत अखिलेश यादव यांना बहुमत सिद्ध करावे लागेल.
३. उमेदवार यादी जाहीर करण्यापूर्वी पक्षाची बैठक मुलायम यांनी घेतली नसल्यामुळे हकालपट्टी असंविधानिक आहे का...
४. मुलायम सिंग यांना हकालपट्टी करण्याचे अधिकार आहेत का...
५. रामगोपाल यादव महासचिव असल्यामुळे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे का..
अखिलेश यादव यांना पक्षातून काढल्यामुळे ते मुख्यमंत्री पदावर राहू शकत नाही. अशावेळी त्यांना विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे लागेल. त्यावेळी अखिलेश यांच्या पारड्यात कोण मतदान करतं हे पाहावं लागेल. त्यामुळे अखिलेश आणि मुलायमसिंह यांची ताकद दिसून येईल. परंतू बहुमत सिद्ध करता आलं नाही तर अखिलेश यांना मुख्यमंत्रीपदावरून उतरावं लागेल. त्याजागी दुसरा समाजवादी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल... हे मुलायम ठरवतील...
रामगोपाल यादव यांनी हकालपट्टी असंविधानिक असल्याचं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र मुलायम सिंह हे पक्षाचे प्रमुख असल्यामुळे त्यांना ते अधिकार आहेत. त्याचबरोबर संविधानाप्रमाणे मुलायमसिंह यादव यांनाच राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचा अधिकार आहे. रामगोपाल यादव हे महासचिव असले तरी ते राष्ट्रीय अधिवेशन बोलावू शकत नाहीत.
रामगोपाल यादव यांनी १ जानेवारी रोजी बोलविलेले अधिवेशन म्हणजे नवीन पक्षाची पायाभरणी आहे. त्यात मुलायमसिहं आणि शिवपाल यांना स्थान नाही. त्यामुळे अखिलेश यांचं नवीन नेतृत्व आणि मुलायम, शिवपाल यांचं राजकारण हे दोन्ही पिढीतला फरक दर्शवतो आहे. अखिलेश यादव यांचे समर्थक आता मुलायम आणि शिवपाल यांच्या विरोधात रस्त्यावर उभे ठाकले आहेत. अशावेळी आपली ताकद ओळखून अखिलेश निवडणूकीला समोर जाण्याच्या तयारीत अाहे.
काँग्रेसबरोबर उत्तर प्रदेशात निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव अखिलेश यांचाच होता. मात्र मुलायम आणि शिवपाल यांच्यामुळे तो प्रस्ताव फेटाळला गेला. परंतू अखिलेश स्वबळावर निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असतील तर ते काँग्रेसबरोबर युती करण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष, बसप आणि भाजपवर नाराज असलेले मतदार अखिलेश यांच्या पाठीशी उभे राहतील. अशावेळी भाजपची मोठी कोंडी होईल. मात्र, अखिलेश आणि काँग्रेस हे गणित जमलं नाही तर भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेश निवडणूकीत विजय मिळवू शकेल.
नवीन यादी, हकालपट्टी, राष्ट्रीय अधिवेशन, पक्षाची शिस्तभंग या चारही मुद्द्यांचा विचार केला तरी मुलायमसिंह यादव यांचे पारडे जड असल्याचे दिसून येते. राजकारणात नेहमी पुत्रप्रेम विजयी झाल्याच्या अनेक कथा आहेत. मात्र, मुलायमसिंह यांनी मुलाची हकालपट्टी करून पुत्रप्रेमावर बंधुप्रेमानं मात केल्याचे उदाहरण समोर आणलं आहे.