मुंडे यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान?

दिल्लीत मुंडे यांच्या कारला झालेल्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सांगलीचे भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासहीत आणखी काही भाजप नेत्यांनी केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 3, 2014, 12:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत मुंडे यांच्या कारला झालेल्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सांगलीचे भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासहीत आणखी काही भाजप नेत्यांनी केलीय.
दिल्लीतील तुघलक रोड पुलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरु केलीय. इथल्याच पृथ्वीराज रोड - तुघलक रोड राऊंड अबाऊटवर गोपीनाथ मुंडे यांच्या गा़डीला आज सकाळी अपघात झाला. महाराष्ट्रात येण्यासाठी भल्या सकाळी विमानतळाच्या दिशेने निघालेल्या मुंडेंच्या खासगी कारला भरधाव इंडिगो कारनं धडक बसली. कारमध्ये मुंडे यांच्याबरोबर त्यांचे स्वीय सहाय्यक नायर देखील होते. अपघातानंतर मुंडे यांनी नायर यांच्याकडे पाणी मागितलं आणि रुग्णालयात नेण्यास सांगितलं. जखमी झालेल्या मुंडे यांना तातडीनं एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातानंतर त्यांना हृदयविकाराचा धक्का देखील बसला. अखेर सकाळी सात वाजून वीस मिनीटांनी मुंडे यांनी शेवटचा श्वास घेतला.
भाजपचे नेते अवधूत वाघ आणि प्रकाश अण्णा यांनीही या घटनेमागे कट-कारस्थान असण्याची शक्यता व्यक्त केलीय. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी, असं त्यांनी म्हटलंय. तसंच मुंडे सुरक्षेविना बाहरे का पडले? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर परळी आणि बीडमध्ये सगळ्या व्यापारपेठा बंद ठेवण्यात आल्यात. मुंडेंच्या निधनानंतर संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरलीय. त्यांच्या पार्थिव शरीरावर उद्या परळीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निधनाचं वृत्त समजताच भाजप कार्यालयासमोर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमलेत. कार्यकर्त्यांना शोक अनावर झालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.