बंगळुरू : एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यानं आपल्या बॉसवर लैंगिक छळाचा आरोप केलाय.
डोकं दुखतंय असं बॉसला सांगितल्यानंतर त्यानं आपल्याला 'व्हाएग्रा'ची गोळी दिल्याचा आरोप या २२ वर्षीय तरुणीनं केलाय. ही तरुणी बंगळुरूतल्या जलाहल्ली स्थित फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट फर्ममध्ये काम करतेय.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून आपला बॉस आणि मॅनेजर असलेला ३८ वर्षीय मलप्पा आपली लैंगिक छळवणूक करत असल्याचा आरोप या महिलेनं केलाय.
ऑफिसमध्ये कुणीही नसतं तेव्हा मलप्पा आपला दुपट्टा खेचत होता किंवा आपल्या वाईट पद्धतीनं शारीरिक स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता, असा या तरुणीचा आरोप आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर या मॅनेजरनं आपल्याला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. पण, त्याची पत्नी सध्या अमेरिकेत आहे, असंही तिनं म्हटलंय.
आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले तर आर्थिक मदत आणि चांगली नोकरी मिळवून देण्याचं आमिषही त्यानं आपल्याला दाखवलं होतं... पण, तेव्हा मी असहाय्य होते, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, कुणी मला मदत करणार नाही आणि नोकरी गमावण्याचीही भीती होती, असाही या तरुणीनं आपल्या तक्रारीत म्हटलंय.