www.24taas.com, गुवाहाटी
आसाममध्ये गुरुवारी पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. ताजी घटना ही बक्शा जिल्ह्यातील आहे. येथे बलवाई आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत अनेकजण जखमी झाले आहेत.
केंद्र सरकारने आसाममध्ये कोणताही धोका नाही, असे स्पष्ट केले असताना हिंसाचार सुरूच आहे. गुरुवारी सुरु झालेला हिंसाचार बुधवारी रात्री एका व्यक्तिवर झालेल्या हल्ल्याच्या प्रतुत्तरात केला गेला. बुधवारी रात्री बक्शामध्ये एका व्यक्तीवर हल्ला झाला आणि एक नॅनो कार जाळण्यात आली होती. गुरुवारी जमावाने अनेक बस आणि लाकडी पुल आगीच्या भक्षस्थानी दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड अँक्शन फोर्स आणि लष्कराला तैनात करण्यात आले आहे. आसाममध्ये तणाव कायम आहे.
सामच्या बोडोलँड (बीटीसी) मध्ये २० जुलैपासून हिंसाचार भडकला आहे. यात आतापर्यंत ७६ लोकांचा मृत्यू झाला असून साडेचार लाखाहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.
पुण्यात खबरदारी
पुण्यात इशान्येकडच्या राज्यांतल्या विद्यार्थ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांची बैठक घेतली. पुण्याच्या कॅम्प आणि कोंढवा परिसरात गेल्या आठवडाभरात अशा ८ ते ९ घटना घडल्यायत. समाज कंटाकांकडून इशान्येकडच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात येतंय. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. याप्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आलीय.
तरीही अनेक विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली आहेत. काही जण शहर सोडून जाण्याच्या विचारात आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनातली भीती दूर करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. पुणे पोलिसांनी इशान्येकडच्या राज्यांतल्या विद्यार्थ्यांना चोख सुरक्षा पुरवलीय. हे विद्यार्थी शिकत असलेल्या कॉलेजेसमध्ये आणि राहत असलेल्या वसतीगृहांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. इशान्येकडच्या राज्यांतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेण्यात येतेय.