www.24taas.com,झी मीडिया,ग्रेटर नोएडा
अटकेपार झेंडे फडकावणारे मराठे आणि इंग्रज यांच्यात सप्टेंबर १८०३ साली झालेल्या घनघोर युद्धाची ऐतिहासिक आठवण म्हणून ब्रिटिशांनी एक स्मृतीस्तंभ उभारला. अँग्लो मराठा युद्धाचा इतिहास सांगणारा हा स्मृतीस्तंभ सध्या नोएडा गोल्फ कोर्समध्ये दुर्लक्षित अवस्थेत आहे.
नोएडा गोल्फकोर्स हे मैदान गोल्फ प्रेमींची आवडीची जागा आहे. इथं दररोज अनेकजण गोल्फ खेळायला येतात. विस्तीर्ण अशा या गोल्फ मैदानात आपल्या इतिहासाची एक आठवण आहे. गोल्फ मैदानातील १६व्या होलजवळ २००वर्षांपासूनचा जुना स्मृतीस्तंभ आहे. मराठे आणि ब्रिटिश यांच्यात झालेल्या युद्धाची ही आठवण आहे. अतिशय सुंदर अशा या स्तंभावर मराठे आणि ब्रिटीशांच्या ऐतिहासिक युद्धाची आठवण कोरलीय.
Battle of delhi नावानं हे युद्ध प्रसिद्ध आहे. युध्दाच्या वेळी दिल्ली ही मुघल बादशहा शाह आलमची राजधानी होती. पण बादशाहचं वय आणि त्याची तब्ब्येत खराब होती. त्यामुळे सत्तेची सूत्रं दौलतराव सिंदीया यांच्या हातात होती. त्यावेळी इंग्रजांचं सैन्य आणि मराठ्यांच्या सैन्यात युद्ध होऊन मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांचं सैन्य इंग्रजांपेक्षा जास्त असतानाही आपला पराभव झाला. मराठ्यांच्या सैन्याचं नेतृत्व तेव्हा फ्रेंच सेनापती लुई बॉरक्वाँ यांनी केलं होतं.
मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित ही मोठी आठवण अशा पद्धतीने एका गोल्फ मैदानाच्या मधोमध उभी आहे. आज अनेकांना या युद्धाची आणि इतिहासाची जाणीवही नाही. अँग्लो मराठ्यांच्या या युद्धाचं महत्व यासाठी आहे कारण या युद्धानंतर मराठ्यांची ताकद कमी कमी होत गेली आणि ब्रिटिशांनी उत्तरेत आपली सत्ता आणखी भक्कम केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.