नई दिल्ली : भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असलेले अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हे जवळपास ठरलेलं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा भाजपचे नवीन अध्यक्ष बनू शकतात. शहा यांच्या नावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही सहमती दिल्याचं कळतंय. संसदेच्या बजेट अधिवेशनापूर्वी अमित शहांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सरकारमध्ये गृह मंत्रालयाचं पद सांभाळल्यानंतर आता भाजपचे नवे अध्यक्ष कोण, याची चर्चा सुरू झाली होती.
अमित शहा यांच्या नावाची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरूण जेटली, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर वाढलेली आहे. यापूर्वी सरकारच्या स्थापनेनंतर पक्ष संघटनेत बदल होणार हे स्पष्ट झालं होतं.
राजनाथ सिंह म्हणाले, एक व्यक्ती एक पद या पक्षाच्या तत्त्वानुसार लवकरच ते अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. पक्षाचे महासचिव अमित शहा, जेपी नड्डा आणि ओम प्रकाश माथुर या तिघांचे नावं अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. भाजप मुख्यालयात आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार होती. मात्र राजधानी एक्स्प्रेस दुर्घटनेमुळं ती स्थगित करण्यात आली. अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदं मिळाल्यानं पक्षात आता मोठे बदल होण्याची संकेत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.