पाटणा : चहूकडून टीका झाल्यानंतर बिहारचे आरोग्यमंत्री आणि लालुप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी आपल्या घराबाहेरची रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी हलवली.
तेजप्रताप यादव यांनी आपल्या शासकीय निवासस्थानाबाहेर सेवेतली रुग्णवाहिका उभी करून ठेवली होती. 'आपल्याला भेटायला येणाऱ्या नागरिकांना उन्हात उभं राहावं लागतं... त्यावेळी कुणाची प्रकृती बिघडते' अशा नागरिकांसाठी ही रुग्णवाहिका घराबाहेर उभी ठेवल्याचं अजब कारण तेजप्रताप यादव यांनी दिलं होतं.
मात्र नियमानुसार राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच रुग्णवाहिका उभी केली जाते. पण, बिहारच्या आरोग्यमंत्र्यांनी स्व:तच्या निवासस्थानाबाहेरही रुग्णवाहिका उभी करवली.
उल्लेखनीय म्हणजे, पाटणा जिल्ह्यात एकूण १० अत्याधुनिक रुग्णवाहिका आहेत. त्यापैंकी ९ रुग्णवाहिका सेवेत आहे. त्यातलीही एक यादव यांच्या घराबाहेर उभी असल्यानं फक्त ८ रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत होत्या. मात्र, यादव यांच्या घराबाहेरच्या रुग्णवाहिकेबाबच चर्चा झाल्यानंतर तेजप्रताप यांनी ही रुग्णवाहिका घराबाहेरून हलवलीय.