लखनऊ : उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीमध्ये यादवी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काका शिवपाल यांच्यासह चार मंत्र्यांना मंत्रिपदावरून हटवलं आहे. शिवपाल यादव यांच्यासह अमर सिंग यांचे विश्वासू असलेल्या अन्य चार मंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
अखिलेश यांनी शिवपाल यादव यांच्यासह नारद राय, शादाब फातिमा आणि ओमप्रकाश सिंग यांना मंत्रिंमंडळातून डच्चू दिला आहे. कॅबिनेटमधून डच्चू मिळाल्यानंतर शिवपाल यादव यांनी रामगोपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे.
सीबीआयपासून वाचण्यासाठी रामगोपाल यांनी भाजपशी हातमिळवणी केलीये हे मुख्यमंत्र्यांना कळायला हवं होतं असं शिवपाल म्हणाले आहेत. दरम्यान समाजवादी पार्टीमधील गृहकलह गंभीर वळण घेत असताना पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी उद्या तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदार, मंत्री, खासदार, माजी खासदार, माजी आमदार, ब्लॉक प्रमुख यांच्यासह इच्छुक उमेदवारांना बोलवण्यात आलं आहे. या बैठकीला अखीलेश यादवही उपस्थित रहाणार आहेत.