जयपूर : पाकिस्तानातील दहशतवादी आणि मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याने तुरुंगात मटन बिर्यानी मागितलेली नाही, असा धक्कादायक खुलाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलाय.
अजमल कसाब याने तुरूंगात असताना कधीही मटन बिर्यानी मागितली नव्हती. केवळ जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी तसे म्हटले होते, असे निकम आज स्पष्ट केले. ते शुक्रवारी जयपूर येथील दहशतवादविरोधी परिषदेत बोलत होते. निकम यांच्या या एका विधानामुळे त्यावेळी २६/११ खटल्याचे कामकाज जलदरित्या व्हावे, या मागणीने जोर धरला होता.
अफझल गुरू , कसाब किंवा भारतीय नौदलाकडून बुडविण्यात आलेल्या पाकिस्तानी नौकेचे प्रकरण या सगळ्या घटनांची चर्चा होते तेव्हा, लक्ष वेधून घेण्यासाठी 'त्यांना बिर्यानी का खायला घालत आहात, असा प्रश्न सहजपणे केला जातो. याच गोष्टीचा धागा पकडून निकम यांनी ते विधान केले होते.
निकम यांनी पुन्हा प्रसिद्धी माध्यमांना जबाबदार धरले. प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने आणि निरीक्षकाची भूमिका बजावली पाहिजे. अशाप्रकरणांत प्रसारमाध्यमे संबंधित कैदी म्हणजे बळीचा बकरा आहे, असे वातावरण निर्माण करतात. ही गोष्ट चुकीचे असल्याचे मत यावेळी निकम यांनी व्यक्त केले.
कसाब खटल्याच्यावेळी प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेल्या वातावरणामुळे लोकांच्या विचार करण्याचा पद्धतीत फरक पडत असल्याचे मी पाहत होतो. त्यामुळे मी स्वत:हून 'कसाबने बिर्यानी मागितली होती', असे विधान करून, लोकांचे लक्ष वेधून घेतले. कसाब खटल्याच्या सुनावणीदरम्यान भावनिक होतो आणि रडतो , या प्रसारमाध्यमांतील बातम्यांमुळे तेव्हा फार गोंधळ माजला होता. कसाबला त्यावेळी पश्चाताप होत नव्हता, तो फक्त तशी बतावणी करत होता. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी न्यायालयाबाहेर अशाप्रकारे समांतर खटला चालवू नये, असे निकम यांनी म्हटले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.