www.24taas.com, नवी दिल्ली
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याशी फारकत घेतल्यानंतर अण्णांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आज पत्रकारांशी चर्चा करताना, ‘आंदोलनात राजकारणाचा पर्याय आपण मांडला नव्हता’ असं अण्णा हजारेंनी स्पष्टपणे म्हटलंय. उलट जेव्हा हा प्रस्ताव आला, तेव्हा आपण काही गोष्टींचे खुलासे मागितले होते. ते आपल्याला देण्यात आले नाहीत, असं म्हणत अण्णांनी केजरीवालांना टोमणा मारलाय.
राजकारणात येण्याच्या मुद्द्यावरून अण्णा हजारेंच्या इंडिया अगेन्स्ट करप्शनचं विसर्जन करावं लागलं. राजकीय पक्ष हा आंदोलनाचाच एक भाग आहे, असं केजरीवाल यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं. अण्णांच्या आणखी एक सहकारी किरण बेदी यांनीही केजरीवाल यांचा पक्ष आंदोलनाची ताकद वाढवणारा असल्याचं म्हटलं होतं. स्वतः अण्णांचं मत मात्र संपूर्ण विरोधी असल्याचं दिसतंय. रविवारी दिल्लीत दाखल होताच पक्ष स्थाण्याबाबत त्यांना विचारल्यावर अण्णांनी, राजकारण अपवित्र आणि घाणीची दलदल असलेलं क्षेत्र असल्याची प्रतिक्रिया दिली. तसंच आपण काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्याचं निरसन करण्यात आलं नाही, असं सांगत केजरीवालांनी आपल्याला अंधारात ठेवल्याचं अण्णांनी सूचित केलंय. त्यामुळे आता काही प्रश्न निर्माण होत आहेत. राजकारणात उतरण्याची कल्पना नक्की कोणाची होती? त्यांचे काही सहकारी खासगित म्हणतात तसं, अण्णांनी पक्षाचा पर्याय सुचवला होता का? की अरविंद केजरीवाल यांनीच पक्षाचं घोडं पुढे दामटलं? या प्रश्नांची उत्तरं अण्णांच्या पाठिराख्यंना हवी आहेत. केजरीवालांच्या भावी पक्षाची दिशा आणि वाटचाल, या उत्तरांवर अवलंबून असणार आहे.
अण्णा या दिल्ली दौऱ्यात कार्यकर्त्यांशी आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्याबाबत चर्चा करणार आहेत. तसंच विविध क्षेत्रांतील नामवंतांशीही अण्णा उद्या चर्चा करणार आहेत. राजकीय पक्ष न काढण्याचा निर्णय अण्णांनी घोषित केल्यानंतर अनेक आयएएस, आयपीएस तसंच सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारविरोधी लढाईत सामील होण्यासाठी अण्णांशी संपर्क साधला होता. या अधिकाऱ्यांशीही अण्णा चर्चा करणार आहेत.