गोली नही, बोली से ही होगा काम; डी कंपनीला फर्मान

अब गोली नही, बोली से काम चलाओ...’ हा हुकूम आहे अंडरवर्ल्डचा कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम याचा... कारण दाऊदला आपल्या दोघा भावांना भारतात पाठवायचंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 21, 2013, 11:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘अब गोली नही, बोली से काम चलाओ...’ हा हुकूम आहे अंडरवर्ल्डचा कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम याचा... कारण दाऊदला आपल्या दोघा भावांना भारतात पाठवायचंय. त्यामुळं तूर्तास कोणताही नवा कायदेशीर पंगा नको म्हणून दाऊद भाईनंच `डी कंपनी`वाल्यांसाठी हे फर्मान काढलंय.
‘डी कंपनी’च्या गुंडांसाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकिलनं थेट दुबईहून हे आदेश जारी केलेत, अशी सूत्रांची माहिती आहे. किमान पुढचे काही महिने आपल्या गुन्हेगारी कारवाया सांभाळून करा, एवढंच नव्हे तर शक्यतो हत्यारांचा वापरच करू नका. होईल तोपर्यंत बोलबच्चन देऊनच कामं करून घ्या, अशी स्पष्ट ताकीद भाईनं दिलीय.
मुंबई पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांना दाऊदच्या या फर्मानाची माहिती मिळालीय. दाऊदच्या कारवायांवर नजर ठेवून असलेल्यांनाही भाईच्या या नव्या आदेशामुळं काहीसा धक्का बसलाय. कारण आजवर दाऊदनं दहशतीच्या जोरावरच आपलं साम्राज्य प्रस्थापित केलंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद आपल्या दोन्ही भावांना भारतात का पाठवतोय? याची अनेक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानात दाऊदला पाठीशी घालणारी ‘आयएसआय’ ही गुप्तचर संघटना आणि तालिबान यांच्यात सध्या संघर्ष सुरू आहे. दुसरं म्हणजे मुंबईतील दाऊदचा विस्तारलेला रिअल इस्टेटचा व्यवसाय... त्याची जबाबदारी दाऊदला आता आपल्या निकटवर्तियाकडं सोपवायचीय. दाऊदचे छोटे भाऊ मुस्तकीन आणि हुमायू यांच्या विरोधात भारतात कोणतीही केस प्रलंबित नाही. त्यामुळे कोणत्याही कायदेशीर अडचणीत न सापडता ते भारतात परतू शकतात. अशा परिस्थितीत अंडरवर्ल्डचा सर्वात मोठा `भाई` आपल्या दोघा छोट्या भावांच्या मार्गातील अडसर ठरू इच्छित नाहीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.