दिल्लीत ‘आप’ बनवणार सरकार... मुख्यमंत्री कोण?

दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी आम आदमी पार्टीकडून दिल्या गेलेल्या वेळेनुसार आजचा शेवटचा दिवस आहे. पार्टीचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांनी सत्ता स्थापनेसंबंधी सोमवारी निर्णय जाहीर करण्यात येईल, असं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 22, 2013, 03:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी आम आदमी पार्टीकडून दिल्या गेलेल्या वेळेनुसार आजचा शेवटचा दिवस आहे. पार्टीचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांनी सत्ता स्थापनेसंबंधी सोमवारी निर्णय जाहीर करण्यात येईल, असं म्हटलंय... राहिला प्रश्न मुख्यमंत्रीपदाचा तर, दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत पक्षाचे आमदारच निर्णय घेतील, असंही त्यांनी म्हटलंय.
दिल्लीत ‘आप’नं इतर पक्षांशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन करावी किंवा नाही, याबद्दल अरविंद केजरीवाल यांनी जनतेला एसएमएस आणि ऑनलाईन आपली मतं कळविण्याची विनंती केली होती. याबद्दलचा निर्णय येण्यासाठी आता केवळ काही तास उरलेत. यादरम्यान, जवळजवळ ९० टक्के लोकांनी काँग्रेसचं समर्थन घेऊन ‘आप’नं सत्ता स्थापन करण्याचे आदेश दिलेत... तसंच या लोकांना मुख्यमंत्र्यांच्या रुपात अरविंद केजरीवाल यांना पाहण्याची इच्छा आहे.
सरकार बनविण्यासंदर्भात अंतिम निर्णय सोमवारी घेतला जाईल. इंटरनेट आणि मोबाईल फोनवर मिळालेल्या ६.८० लाख मतांमध्ये सर्वात जास्त मतं ‘सत्ता स्थापन करावी’ या मताचे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आप’नंही सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरू केलीय.
पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे, जनतेनं जरी आपलं म्हणणं नेत्यांपर्यंत पोहचवलं असलं तरी ‘आप’चा कार्यक्रम आपल्या शेड्युलप्रमाणेच पार पडेल. पारदर्शकता कायम राखण्यासाठी सगळ्या जाहीर सभांचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येतंय. अरविंद केजरीवाल यांचा रविवारी चार जाहीर सभांचा कार्यक्रम आहे.
दुसरीकडे, किरण बेदी यांनी ‘आप’च्या जनमत चाचणी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेत. ‘आप’ला सत्ता स्थापनेसाठी विरोधीपक्षांशी हातमिळवणी करावी लागेल. निवडणुकीनंतर जनमत चाचण्या घेणं म्हणजे लोकतांत्रिक पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखं आहे. किरण यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘आप’ सरकार बनवण्याच्या मुद्यावरून पेचात अडकलीय... आणि त्यामुळेच ‘आप’च्या नेत्यांची स्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशीच झालीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.