मुस्लिमांच्या नमाजात योगाची आठ आसनं!

'मुस्लिमांच्या नमाज पठणाच्या पद्धतीमध्ये योगाच्या आठ आसनांचा समावेश आहे. नमाज पठण करताना प्रत्येक मुस्लिम व्यक्ती ही आसने करते. तरीही योग इस्लामविरोधी कसा आणि त्याला मुस्लिमांचा विरोध का?,' असा सवाल केंद्रीय आयुषमंत्री अर्थात योगमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला आहे.

Updated: Jun 9, 2015, 07:32 PM IST
मुस्लिमांच्या नमाजात योगाची आठ आसनं! title=

नवी दिल्ली : 'मुस्लिमांच्या नमाज पठणाच्या पद्धतीमध्ये योगाच्या आठ आसनांचा समावेश आहे. नमाज पठण करताना प्रत्येक मुस्लिम व्यक्ती ही आसने करते. तरीही योग इस्लामविरोधी कसा आणि त्याला मुस्लिमांचा विरोध का?,' असा सवाल केंद्रीय आयुषमंत्री अर्थात योगमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला आहे.

येत्या २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जाणार आहे. भारतात या दिवशी शाळा, कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना आसनांचे धडे दिले जाणार आहेत. मुस्लिम संघटनांनी यातील काही आसनांना विशेषत: सूर्यनमस्काराला विरोध दर्शवला आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर नाईक यांनी योगाबद्दल स्वत:ची मतं मांडली. 

'संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या प्रस्तावाला अनेक मुस्लिम राष्ट्रांनीही पाठिंबा दिला होता. भारतातील योग दिनाच्या सोहळ्यासाठी अनेक देशांतील राजदूतांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात मुस्लिम राष्ट्रांच्या राजदूतांचाही समावेश आहे,' असंही नाईक यांनी सांगितलं.

श्रीपाद नाईक यांनी यावेळी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. 'माजी पंतप्रधान व काँग्रेसच्या दिवंगत नेत्या इंदिरा गांधी या धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या शिष्या होत्या. त्या स्वत: योग करत होत्या. त्यांनी मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थानाची स्थापना केली होती. माझ्या माहितीनुसार, सोनिया गांधी याही योग करतात. असं असताना योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास काँग्रेसला काय अडचण आहे हेच कळत नाही,' असं नाईक म्हणाले.

'योग हा अनेक विद्वानांच्या अभ्यासातून जन्माला आला आहे आणि तो अनुभवसिद्ध आहे. योगाचा संबंध केवळ व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याशी आहे. त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. त्यामुळं त्याला इस्लामविरोधी मानणंच चूक आहे,' असं नाईक म्हणाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.