www.24taas.com,नवी दिल्ली
२६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबवर सुरक्षेसाठी ३१.४० कोटी रूपये खर्च आल्याची माहिती संसदेत देण्यात आली. ३१.४० कोटी रूपये खर्च झाल्याचे एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने हे स्पष्ट केलंय.
मुंबईतील २६/११च्या हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला गेल्याच महिन्यात पुण्यातील एरवडा तुरूंगात गुप्तपणे फांशी देण्यात आली होती. त्यासाठी कसाबला मुंबईतून पुण्यात रस्तामार्गे हलविण्यात आले होते.
शिवसेनेचे राज्यसभा सदस्य भरतकुमार राऊत यांनी कसाबच्या खर्चाबाबत प्रश्न विचारला होता. राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्री आर. पी. सिंह यांनी कसाबच्या सुरक्षेपोटी ३१.४० कोटी खर्च आल्याचे सांगितले. लेखी उत्तर देताना राज्यसभेत ही माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र सरकार आणि भारतीय तिब्बेटी सीमा पोलीस यांच्याकडून खास सुरक्षा पुरविण्यात आली होती. त्यानुसार २३ नोव्हेंबर २०१२ पर्यंत कसाबच्या सुरक्षिततेसाठी ३१,३९,०२,५८९ रूपये खर्च केला गेला, अशी माहिती राज्यसभेत गृह राज्यमंत्री सिंह यांनी माहिती दिली.