बलात्काराच्या घटना होत राहतात – गृहमंत्री शिंदे

दिल्लीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट आहे. लोक रस्त्यावर तर विरोधी खासदारांनी संसदेत आवाज उठवलाय. मात्र, असे असताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संतापाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 22, 2013, 04:43 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्लीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट आहे. लोक रस्त्यावर तर विरोधी खासदारांनी संसदेत आवाज उठवलाय. मात्र, असे असताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संतापाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केलेय.
बलात्काराच्या घटना देशात सगळीकडेच घडत असतात. दिल्लीतील बलात्काराचीच एवढी चर्चा कशाला, असा अजब प्रश्न शिंदे यांनी केला आहे. संसदेत या प्रकरणी निवेदन करताना शिंदे यांनी पाच वर्षांच्या चिमुरड्याच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले.

दरम्यान, विरोधकांनी शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी संसदेत लावून धरली. त्यामुळे संतापलेल्या शिंदे यांनी अशा घटना देशभरात होतात. दिल्लीच्या प्रकरणाचा एवढा गहजब कशाला, असे वादग्रस्त विधान केलेय. या बेजबाबदार विधानाचा निषेध करण्यात येत आहे.
राजधानी दिल्लीतील गांधी नगर येथील अमानुष बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यापासून दिल्लीत जनक्षोभ उसळला आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारकडे पर्यायाने सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. याच मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोध पक्षांनी गृहमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला.
दिल्लीतील आंदोलन रोखण्यासाठी मेट्रोची तीन स्टेशन बंद करण्यात आली आहेत. लोकांचा रस्त्यावरील विरोध वाढतच आहे. आंदोलनात सर्वसामान्यांसह भाजपने उडी घेतल्याने आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे.