www.24taas.com, झी मीडिया, लंडन
‘टॅल्कम पावडर’ वापरणाऱ्या स्त्रियांना अंडाशयाचा कॅन्सरचा धोका एक चतुर्थांश वाढतो, असं आता एका नव्या शोधानुसार समोर आलंय.
शोधकर्त्यांनी कॅन्सर पीडित ८,५२५ महिला आणि ९,८०० स्वस्थ महिलांच्या सवयींचा अभ्यास केला. टॅल्कम पावडरचा वापर ही यातील महत्त्वाची बाब होती. अभ्यासानंतर शोधकर्त्यांनी जनेंद्रियांच्या जवळ टॅल्कम पावडरचा पावर केला तर त्याचा परिणाम शरीराच्या आतील भागातही होऊ शकतो, असं लक्षात आलंय. यामुळे शरीराच्या आतील भागात सूज निर्माण होऊ शकते आणि त्यामुळेच कॅन्सरचा धोका बळावतो.
‘कॅन्सर प्रिव्हेन्शन रिसर्च’ या नावाखाली प्रकाशित करण्यात आलेल्या या संशोधनानुसार, आंघोळ केल्यानंतर नियमित स्वरुपात पावडरचा वापर करणाऱ्या महिलांच्या अंडाशयात गाठ आढळल्या. यामुळे कॅन्सरचा धोका २४ टक्के वाढतो.
अंडाशयाच्या कॅन्सरला ‘सायलेंट किलर’ही म्हटलं जातं. कारण, याची लक्षणे समोर येईपर्यंत कॅन्सरचा परिणाम शरीरात चांगलाच वाढलेला असतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.