हे बोलणं बरं नव्हं....

मधु चव्हाण ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रकरणी केलेले वक्तव्य देशभरातील युवकांच्या मनात चीड निर्माण करणारे आहे. परंतु प्रशांत भूषण यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्र संघातील प्रतिनिधी करत आहेत.

Updated: Oct 22, 2011, 03:03 PM IST

मधु चव्हाण, प्रवक्ते भाजपा

 

ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रकरणी केलेले वक्तव्य देशभरातील युवकांच्या मनात चीड निर्माण करणारे आहे. परंतु प्रशांत भूषण यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्र संघातील प्रतिनिधी करत आहेत. आणि त्यांना पाठिंबा देण्याचे काम प्रशांत भूषण सारखी लोक करत आहेत. प्रशांत भूषण सारखी मंडळी एकप्रकारे देशद्रोहच करत आहेत. आणि त्यामुळेच अशा तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काश्मीर हा प्राचीन आणि अनंत काळापासून भारताचा अविभाज्य भाग आहे.

 

भगवान बुध्दांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त होण्याचा आदल्या दिवशी पडलेल्या स्वप्नात त्यांचे पाय कन्याकुमारीच्या समुद्राला तर डोकं लडाखला टेकल्याचं दृष्टांत झाला होता. अशा स्वरूपाचे दाखले देशाच्या हजार वर्षाच्या इतिहासात जागोजागी सापडतात. त्यामुळेच काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही. काश्मीर खोऱ्यातील अगदी थोड्या अंसतुष्ट मंडळीच सार्वमताची मागणी करताहेत तर लडाखमधील जनता प्रदेश केंद्रशासीत व्हावं या मताची आहे. जम्मू प्रदेशातील जनतेलाही भारतातच राहायचं आहे. काश्मीरला 370 कलमान्वये वेगळा दर्जा देण्यात आला आहे.

 

केंद्र सरकार दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी काश्मीरला देत असते. काश्मीरमधून लष्कर काढून घेण्याची मागणी प्रशांत भूषण यांनी केलीय. काश्मीरमधून लष्कर मागे घेतल्यास तेथील दहशतवादाशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य तिथल्या पोलीस दलात नाही. काश्मीरला सार्वमत बहाल केल्यास काश्मीरचा विकास होईल का? काश्मीरी जनतेच्या राहणीमानात सुधारणा होईल का? काश्मीरातील कृषी क्षेत्राला लाभ होईल का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. अमेरिकेला भारताचे विभाजन छोट्या राज्यात व्हावं अशी इच्छा आहे. काश्मीरला स्वायत्ता बहाल केल्यास संपूर्ण देशाच्याच विघटनाची प्रक्रिया वेगाने होईल ही भीती आहे.

 

अण्णांच्या आंदोलनाला दैनंदिन जीवनातील भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या लोकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला असला तरी ते मसीहा नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनाला प्राप्त झालेलं वलय अण्णांच्या डोक्यात गेलं आहे. मला कळतं, मलाही कळतं आणि फक्त मलाच कळतं असं म्हटलं जातं. या पैकी आता अण्णा फक्त मलाच कळतं या टप्प्यावर येऊन पोहचलेत. महात्मा गांधींनीही अशा प्रकारची भूमिका कधी घेतली नव्हती.

 

दिग्विजय सिंहांना वेड लागलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही. पण जसं मेथड इन मॅडनेस अशी व्युहरचना असते तसं ते करत असलेली वादग्रस्त वक्तव्य कदाचीत हायकमांडच्या इशाऱ्यावरुन करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

शब्दांकन- मंदार मुकुंद पुरकर