चांडाळ चौकडी कोण? अण्णा तुम्हीच ठरवा

अनंत गाडगीळ अण्णांनी काँग्रेसमधील अनेक लोकांना चांडाळ चौकडी संबोधले आहे, एकप्रकारे त्यांनी टीकाच केली आहे, ज्यापद्धतीने 'टीम अण्णा' काँग्रेसवर टीका करत आहेत, त्याने या लोकांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. काँग्रेस टार्गेटमुळे अण्णा आणि टीम अण्णांचे भष्ट्राचार विरोधी आंदोलन भरकटत चालल्याचे यावरून दिसते.

Updated: Oct 26, 2011, 07:09 AM IST

अनंत गाडगीळ, प्रवक्ते काँग्रेस 

 

अण्णांनी काँग्रेसमधील अनेक लोकांना चांडाळ चौकडी संबोधले आहे, एकप्रकारे त्यांनी टीकाच  केली आहे, ज्यापद्धतीने  'टीम अण्णा' काँग्रेसवर टीका करत आहेत, त्याने या लोकांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  काँग्रेस टार्गेटमुळे अण्णा आणि टीम अण्णांचे  भष्ट्राचार विरोधी आंदोलन भरकटत चालल्याचे यावरून दिसते. आजवर काँग्रेसने कोणावरच वैयक्तिक टीका कधीच केली नव्हती. त्याउलट टीम अण्णांच्या लोकांनी प्रत्येक वेळेस वैयक्तिक टीका केल्याने ते अधिकच गोत्यात आल्याचे दिसते.

 

काँग्रेसने कधीच कोणालाही 'चाडांळ चौकडी' यासारखे शब्द वापरले नाहीत, आंदोलन योग्यरितीने सुरू होते तेव्हासुद्घा टीम अण्णांच्या सदस्यांची मुजोरी वृत्ती आणि ताठा हा कायम होता. या साऱ्यामुळे आज त्यांच्यामध्ये फुटीचे राजकरण सुरू झाले आहे. किरण बेदींनी केलेला हवाई घोटाळा समोर येताच त्यांची सुद्धा भंबेरी उडाली.  टीम अण्णांमध्ये अनेक वादांना तोडं फुटल्याचे  दिसून येत आहे.

 

नुकतेच स्वामी अग्निवेश यांनी अण्णांच्या आंदोलनामध्ये मिळालेल्या 'देणगी' च्या पैशाचे 'ऑडिट'ची  मागणी केली.  काही काळ हेच स्वामी अग्निवेश या टीम अण्णांचे सदस्य होते. आणि त्यामुळेच त्यांनी केलेली ही मागणी अत्यंत  बोलकी तर आहेच, मात्र तितकीच त्यांची मागणी विचार करण्यास भाग  पाडणारी आहे.  जे लोक भष्ट्राचाराविरोधी मोहीम हाती घेतली त्यांच्याचबद्दल अविश्वासाचे वारे वाहू लागलेत. म्हणजेच आता अण्णांनीच ठरवावे की चांडाळ चौकडी कोण?

 

 हिस्सार निवडणूक 

 

हिस्सार निवडणूकीचा जो निकाल लागला तो टीम अण्णांनी  केलेल्या प्रचारामुळे. अशा  वल्गनाच टीम अण्णांनी केल्या, त्यांच्यामते, या निवडणूकीचा निकाल जणू त्यांच्या काँग्रेसविरोधी प्रचारामुळे समोर आला आहे. उमेदवाराचा पराभव होण्यामागे अनेक कारणे आहेत. आणि तसंही एकाच निवडणूकीच्या निर्णयाच्या निकालाने हूरळून न जाता टीम अण्णांनी स्वत:च्या गोटात लक्ष द्यावे.

 

अनेक वेळा काही गोष्टींच खापर काँग्रेसवर फोडण्यात येतं, प्रशांत भूषण यांनी केलंल वक्तव्य आणि त्यानंतर झालेली मारहाण यांच्यादेखील संदर्भ काँग्रेसशी जोडण्याचे काम काँग्रेसविरोधी लोकांनी सुरू केले. यासारख्या गोष्टीने काँग्रेस कधीच खचून जाणार नाही, याउलट काँग्रेस वाईट गोष्टीविरूद्ध लढण्यास नेहमीच सज्ज असेल.

 

काँग्रेसने नेहमीच चांगल्या गोष्टीचां स्विकार केला आणि करत आहे, त्यामुळे जर अण्णांच्या भष्ट्राचारविरोधी आंदोलनातून जर काही चांगलं बाहेर पडत असल्यास काँग्रेस त्याचा नक्कीच स्विकार करेल, परंतु अण्णांनी याचा विचार करावा की ते आज कोणाचा कोंडावळ्यात अडकले आहेत...

 

शब्दांकन - रोहित गोळे